Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजस्थान कॉंग्रेसमध्ये पुन्हा धुसफूस : तीन मंत्री राजीनाम्याच्या पवित्र्यात

जयपूर वृत्तसंस्था | राजस्थान सरकारमधील अंतर्गत कलह नव्याने उफाळून आला असून तीन मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेत थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहल्याने खळबळ उडाली आहे.

 

अशोक गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंत्रिपदावरुन पायऊतार होऊन पक्ष संघटनेसाठी काम करण्याची इच्छा गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी व्यक्त केली आहे.  राजस्थान सरकारमधील रघू शर्मा, हरीश चौधरी आणि गोविंद सिंह डोटासरा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती राजस्थान कॉंग्रेसचे प्रभारी अजय माकन यांनी दिली आहे. यासाठी तिन्ही मंत्र्यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.

दिवाळीआधीच राजस्थान सरकारमधील मंत्रिमंडळात बदलाचे वारे वाहू लागले होते. पण आता पूर्णपणे बदल करण्याची तयारी कॉंग्रेसनं सुरू केली आहे आणि याच दृष्टीकोनातून हे पहिलं पाऊल टाकलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळातील फेरबदलच्या चर्चेनं जोर धरला असतानाच आज अजय माकन जयपूरमध्ये पोहोचले असून कॉंग्रेस नेतृत्त्व राजस्थानमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.

राजस्थान कॉंग्रेसमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या गटातील कलह हा लपून राहिलेला नाही. मध्यंतरी दोन्ही गटांनी समझोता केल्याने सारे काही शांत झाले असे वाटत होते. मात्र आता हा कलह नव्याने उफाळून येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.  या पार्श्‍वभूमिवर,  येत्या एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळ फेररचना पूर्ण केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. २१ किंवा २२ नोव्हेंबर रोजी मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्याची शक्यता आहे. यातच आज सायंकाळी  मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.  यात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version