Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या राख्या पोचल्या आनंदवनात : डॉ. आमटेंकडून कौतुक

एरंडोल, प्रतिनिधी  । रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या अतूट नात्याच्या धागा जोपासणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणाच्या पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ महिला मंडळाने चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवनातील दिव्यांग,दृष्टीहीन मूलांना राख्या पाठविल्या. डॉ. विकास आमटे यांचे या उपक्रमाचे कौतुक करणारे पत्र मंडळास  प्राप्त झाले आहे. 

 

रक्षाबंधनाच्या दिवशी तेथील मुलांनी या राख्या आनंदाने बांधल्या.  या राख्या या मुलांच्या जीवनात आनंदाची अनुभूति देतील अश्या आशयाचे पञ ‘आनंदवन,संस्थेचे प्रमुख डॉ.विकास आमटे यांनी पाठविले आहे. आपल्या पञात डॉ.आमटे यांनी म्हटले आहे की, आपल्या राजमाता जिजाऊ महिला मंडळाने आनंदवनातील दिव्यांग,दृष्टीहीन मूलांची आवर्जून दखल घेतली, त्यांच्यासाठी राख्या पाठविल्या त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. रक्षाबंधनाच्या छोटेखानी सोहळ्यात आपल्या राख्या या बालकांना बांधल्या. यानिमित्ताने आपले ऋणानुबंध अबाधित राहतील आणि आनंदाची अनुभूति देत राहतील. आपल्या पञात डॉ. आमटे पुढे लिहीतात की, आपला देश हा कोरोना च्या प्रलयकारी विळख्याने जखडलेला आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने समस्त देशवासिय शासनाचे निर्बंध पाळू, एकजूटीने आणि आश्वासक प्रेमधारेने या कोरोनावर विजय मिळवू,अखिल विश्वातून त्याला हद्दपार करू, मंडळाच्या सर्व सभासदांचे आनंदवनी मन:पूर्वक स्वागत..संपर्क सहयोग स्वागत..

आनंदवनातील बालकांना राख्या मिळाल्या, त्या त्यांनी आनंदाने स्विकारून बांधल्याने राजमाता जिजाऊ महिला मंडळातील सदस्यांना आनंद तर झालाच सोबत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून दिव्यांग, दृष्टीहीन,अनाथ बालकांना एका दिवसाचा, काही क्षणांचा आनंद मिळाला याचे ही खूप समाधान लाभले. कोरोना महामारीमुळे इच्छा असूनही कोणत्याही कार्यक्रमांचे आयोजन करता आले नाही. राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच महीलांमधील जागृतीसाठी परीश्रमपूर्वक काम सूरू आहे.  विधवा, परीतक्त्या महीलांना जीवन जगण्यासाठी सहकार्य करून,संकटांना सामोरे जावून खंबीरपणे उभे राहण्यासाठी मायेची उब देणे हेच महत्वपूर्ण काम आहे. या उपक्रमासाठी राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या सचिव वंदना पाटील,अध्यक्षा  शकुंतला अहीरराव यांनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version