Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजकीय हस्तक्षेपाला कंटाळूनच जयस्वाल केंद्रात गेले — फडणवीस

 

मुंबई : वृत्तसंस्था । राजकीय हस्तक्षेपाला कंटाळून राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल केंद्रात परत गेल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे

पोलिसांच्या बदल्यांवरून राज्य सरकारशी झालेल्या वादानंतर केंद्रात परत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी बुधवारी नियुक्ती करण्यात आली. मात्र आता यावरुनच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीवरुन राज्यातील सरकार हे पोलीस खात्याच्या कारभारामध्ये हस्ताक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी देखरेखीचे काम करणं अपेक्षित असतं. मात्र बदलीपासून प्रत्येक गोष्टीमध्ये सध्या हस्ताक्षेप होताना दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या कारभाराला कंटाळूनच महासंचालकांनी प्रतिनियुक्ती स्वीकारली आहे, अशी टीका फडवणीस यांनी केलीय. ही परिस्थिती महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावह नसल्याचे सांगत फडणवीस यांनी राज्य सरकारच्या हस्तक्षेपाला कंटाळूनच जयस्वाल यांनी प्रतिनियुक्ती स्वीकारल्याचे म्हटले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

केंद्रातून राज्यात परतल्यानंतर युती सरकारच्या काळात जयस्वाल यांची आधी मुंबई पोलीस आयुक्त आणि गेल्यावर्षी पोलीस महासंचालकदी नियुक्ती झाली होती. पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर गेल्या काही महिन्यांत पोलिसांच्या बदल्या आणि राजकीय हस्तक्षेपावरून महासंचालक जयस्वाल आणि राज्य सरकारमध्ये विशेषत: गृह विभाग यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी केंद्रात जाण्याची मागितलेली परवानगी राज्य सरकारने लगेच मान्य केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने भारतीय पोलीस सेवेच्या सन १९८५ च्या तुकडीतील जयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाल हा नियुक्तीपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत असेल.

Exit mobile version