Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राजकीय दबावापोटी तडीपारीची नोटीस

FIR

मुंबई: वृत्तसंस्था । जोगेश्वरीतील जय जवान गोविंदा पथकाचा प्रशिक्षक संदीप ढवळे याला वर्षभरासाठी तडीपार घोषित करण्यात आलं आहे. राजकीय दबावापोटी पोलीस यंत्रणेचा वापर करून ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचे ढवळे याचे म्हणणे आहे.

एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अन्य एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मारहाण करत असताना त्याला वाचवण्यासाठी पुढे आलो. त्यावेळी समोरील गटाकडून झालेल्या हल्ल्याला प्रतिकार करताना काही जण किरकोळ जखमी झाले. गुन्हा दाखल करण्यात आला काही काळ तुरुंगातही राहावे लागले. न्यायालयाने जामिनावर सुटका केली. मात्र, राजकीय दबावाखाली पोलीस यंत्रणेचा वापर करून तडीपारीची नोटीस बजावली आहे, असे ढवळे याचे म्हणणे आहे.

समाजामध्ये दहशत निर्माण करत असून, दुकानदारांकडे खंडणी मागत आहे, असे खोटे आरोप माझ्यावर होत आहेत, असे ढवळे याचे म्हणणे आहे. माझं कुटुंब दबावाखाली असून, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी कोण घेईल, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. मराठी तरूण असेच तडीपार होवोत आणि देशोधडीला लागोत, अशी व्यथाही त्याने मांडली.

संदीप ढवळे हा मुंबईतील जोगेश्वरी येथील जय जवान गोविंदा पथकाचा प्रशिक्षक आहे. २६ जुलैचा मुंबईतील महापूर, सातारा-सांगलीतील पूर, कोकणातील चक्रीवादळ संकटात सापडलेल्यांना जीवाची पर्वा न करता मी आणि माझ्या पथकातील खेळाडूंनी मदत केली आहे. मात्र, मला विनाकारण गोवण्यात आले आहे. सराईत गुंडासारखी वागणूक दिली जात आहे, असे ढवळेचे म्हणणे आहे.

Exit mobile version