Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रहिमशहा बाबांच्या संदल मिरवणुकीत ओसंडून वाहिला भाविकांचा उत्साह

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | ढोलताशांच्या गजरात, भाविकांच्या जल्लोषात पाकिस्तानचे वलींचे बादशहा रहिमशहा बाबा यांची संदल मिरवणूकरविवारी संध्याकाळी  मयुरेश्वर कॉलनी येथून भारताचे वलींचे बादशहा ख्वाजा गरीब नवाज सरकार यांच्या ख्वाजामियाँ दर्ग्यातील दरबारात पोहोचली. तेथे मानाची चादर भाविकांच्या वतीने चढविण्यात आली. यावेळी भाविकांची श्रद्धा, उपासना, उत्साह ओसंडून वाहत होता.

 

 

भक्तांचे उद्धारक रहिमशहा बाबा यांच्याकडे मोठ्या भक्तिभावात भाविक आयुष्यतील दुःखाचे साकडे घालत असतात. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून संदल मिरवणुक काढण्यात येत आहे. यामुळे धार्मिक वातावरण निर्माण होऊन हिंदू-मुस्लिम एकता दिसून येत असते. माजी सैनिक ज्ञानेश्वर सोनवणे व त्यांच्या पत्नी उषा सोनवणे ह्या मुख्य आयोजक आहेत.

संदल मिरवणुकीत गोरगरीब, मध्यमवर्गीय नागरिक सहभागी झाले होते. बाबा रहिमशहा यांच्या दरबारात विविध मागण्यांचे भाविक साकडे घालीत असतात. बाबा रहिमशहा यांचे मूळ ठिकाण पाकिस्तान आहे. तेथील वलींचे ते बादशहा मानले जातात. भारत देशात वलींचे बादशहा ख्वाजा गरीब नवाज सरकार आहे. त्यामुळे रहिमशहा बाबांकडून रविवारी २५ डिसेंबर रोजी ख्वाजामियाँ चौकातील दर्ग्यात चादर चढविण्यात आली.

ढोल ताशे, नगारे, तुतारीच्या निनादात मिरवणूक गुजराल पेट्रोल पंप मागील मयुरेश्वर कॉलनी, साईबाबा मंदिर, दत्त मंदिर, जुना हायवे रोड, एसएमआयटी कॉलेज, प्रेम नगर, बजरंग बोगदा मार्गे ख्वाजामिया दर्गा येथे समाप्त झाली. रथात सन्मानाने ठेवलेल्या चादरींची विधिवत मिरवणूक काढण्यात आली होती. ख्वाजमिया दर्गा येथे मानाच्या चादरींची विधिवत पूजा करून चादर चढविण्यात आली. मिरवणुकीचा मार्ग सडासमार्जन करून रांगोळी काढून सजविण्यात आला होता.

मिरवणुकीसाठी नितीन राणे,जितू जावळे, जितू बोरोले, छोटू महाजन, संदिप चौधरी, उमाकांत देवरे, दीपक सोनवणे, शौकत दादा, प्रदीप सोलते  आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version