Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्याच्या मालकीवरून बजरंग कॉलनीत रंगला वाद !

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील जुना आसोदा रोडवरील बजरंग कॉलनी भागात रस्त्याच्या मालकीवरून आज नागरिक व त्या जागेवर मालकी हक्काचा दावा करणार्‍यांमध्ये चांगलेच वाद रंगले. यामुळे येथे रस्ता तयार करण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, जुना आसोदा रोडवरील   गोपाळपुरा भागातील बजरंग कॉलनी परिसरात जेसीबीच्या सहय्याने रस्ता तयार करण्याचे महापालिकेतर्फे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळी महापालिका आपल्या शेतात आम्हाला न विचारता विकासकाम करीत असल्याचा आरोप शेत मालक संजय कोल्हे यांनी करून हे काम थांबवण्याचा प्रयत्न केला. तर परिसरातील नागरिकांनी याला प्रतिकार करत हा वहिवाटीचा रस्ता असल्याचे सांगून काम करावे अशी मागणी केली.  

याबाबत मनपा अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता ते ऐकत नाही. येथे अरेरावी सुरु आहे. माझ्या तक्रारीची दखल घेतली जात नसून महिलांना पुढे करून आमच्या जागेत बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप संजय  कोल्हे यांनी केला. बजरंग कॉलनीचे रहिवाशी कोणताही कर महापालिकेला भरत नाही, असे असतांना त्यांच्यासाठी आमच्या शेतात पाणी सोडले जात आहे. रस्ता तयार केला जात आहे. कोणतीही वर्क ऑडर नसतांना हे काम सुरु आहे. याबाबत महापालिकेत अर्ज दिला असता त्यावर कारवाई न करता रस्ता तयार केला जात आहे. त्याच्याकडे  ७/ १२ , मोजणी सीट तसेच खरेदी खत नसल्याचे श्री. कोल्हे यांनी मांडले. कोणत्याही प्रकारे जमीन संपादित न करता रस्ता तयार केला जात असून यासाठी महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत सपकाळे व नगरसेवक प्रवीण कोल्हे हे या रस्त्यासाठी दबाव आणत असल्याचे कोल्हे यांनी याप्रसंगी सांगितले.

दरम्यान, या प्रकारामुळे रस्त्याच्या कामात खोळंबा निर्माण झाला आहे. याविरोधात बजरंग कॉलनीतील रहिवाशी महिला ह्या रस्त्याचे काम सुरु राहावे यासाठी एकवटल्या होत्या. त्यांनी हा रस्ता १०० वर्ष जुना असून संजय कोल्हे हे महिलांशी अरेरावीने वागतात असा आरोप केला.  आम्ही राहत असलेली जागा ही अधिकृत असल्यानेच आम्ही याची खरेदी केली आहे असे मत येथील मांडले. संजय कोल्हे हे निवडून आले नसल्यानेच ते राजकारण करीत आहे. मागील ४० ते ४५ वर्षापासून आम्ही येथे राहत आहोत. हे काम थांबविण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला धमकावल्याचे या महिलांनी सांगितले. आम्हाला आमचा रस्ता मिळावा अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली. 

यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांनी नागरिकांनी वारंवार तक्रार करून त्यांना होणारा त्रास केली आहे. मागील दोन महिन्यापासून या रस्त्यावर तारेचे कंपाऊंड तयार करण्यात आले आहे. खेडीच्या बाजूने येणार्‍या रस्त्यावरील प्लॉटधारकाने मनाई केल्याने त्यांना वहिवाटसाठी दुसरा रस्ता उपलब्ध नसल्याने आम्ही या रहिवाशांना नियमानुसार रस्ता तयार करत आहोत असे स्पष्ट केले.

दरम्यान, या रस्त्यावरून वाद झाले असले तरी या रस्त्याचे काम जेसीबी लाऊन सुरूच असल्याचे दिसून आले.

Exit mobile version