Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रशियाच्या कोरोना लसीची किंमत अंदाजे ७४० रुपये

 

मॉस्को: वृत्तसंस्था । रशियाने आपल्या ‘स्पुटनिक व्ही’ या लशीची किंमत जाहीर केली आहे. ही लस रशियात नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे. तर, इतर देशांमध्ये या लशीचा एक डोस १० डॉलरपेक्षाही (७४० रुपये) कमी किंमतीत उपलब्ध होणार आहे.

मॉडर्ना आणि फायजर यांच्या लशीपेक्षा ‘स्पुटनिक व्ही’ची किंमत कमी असणार असल्याचे याआधीच रशियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. फायजरची किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (१४४६.१७ रुपये) आणि मॉडर्नाची किंमत २५ ते ३७ डॉलर (१८५४ ते २७४४ रुपये) इतकी असणार आहे. त्यामुळे प्रति व्यक्ती ३९ डॉलर आणि ५० ते ७४ डॉलर इतकी लशीची किंमत असणार आहे. फायजर, मॉडर्ना आणि स्पुटनिक व्ही या लशींच्या दोन डोसची आवश्यकता असणार आहे.

रशियाने पहिल्यांदाच कोरोनाला अटकाव करणारी लस म्हणून स्पुटनिकला मान्यता दिली होती. फायजरने आपल्या लशीच्या अंतिम टप्प्यातील चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष जाहीर केल्यानंतर दोन दिवसानंतर रशियाने आपली लस ९२ टक्के प्रभावी असल्याची माहिती दिली. भारतातही रशियन लशीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीच्यावतीने ही चाचणी होणार आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ११ ऑगस्ट रोजी या लशीला मंजुरी दिली असल्याची घोषणा केली होती. या लशीला मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटने संरक्षण मंत्रालयासोबत विकसित केली आहे.

‘स्पुटनिक व्ही’ लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या adenovirus या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. विषाणू SARS-CoV-2 मध्ये आढळणाऱ्या स्ट्रक्चरल प्रोटीनची नक्कल करते. त्यामुळे शरीरात एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.

Exit mobile version