Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रवींद्र वायकर यांची सोमय्यांना मानहानीची नोटीस

 

 

मुंबई: वृत्तसंस्था । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्यावर कोर्लाई व महाकाली येथे जमीन खरेदी केल्याचे आरोप केले होते. वायकर यांनी सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. माफी मागा, अन्यथा फौजदारी कारवाई करू, असा इशारा रवींद्र वायकर यांनी  दिला आहे.

 

किरीट सोमैय्या यांनी काही महिन्यांपूर्वी रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर 19 बंगले असल्याचा तसेच याची माहिती निवडणुक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता. या जमिनीवरील बंगल्याचा वापर  व्यवसायासाठी (एका बंगल्याची किंमत रुपये 5 कोटी आहे.) केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु यावेळी त्यांनी कुठलेही सबळ पुरावे सादर केले नव्हते. त्याचबरोबर महाकाली गुंफा जमीन घोटाळ्यात वायकर यांना अविनाश भोसले व शाहिद बलवा यांच्याकडून रुपये 25 कोटींचा मोबदला मिळाल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांचे हे सर्व आरोप खोटे असून माझ्या कुटुंबासह पक्षाची नाहक बदनामी केली आहे, असं वायकर यांनी म्हटलं आहे.

 

कोर्लाई जमीन प्रकरणी सोमय्या यांच्या आरोपांची काही प्रसारमाध्यमांनीच पोलखोल केली. परंतु मार्च महिन्यात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांनी महाकाली गुंफा येथील जमीन प्रकरणी पुन्हा माझ्यावर खोटे आरोप करून माझी जाणूनबुझून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, असं सांगत मी सोमय्यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटीसीत सोमय्या यांनी कुठलेही सबळ पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी आरोप मागे घेऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरे जावे, असा इशाराही वायकर यांनी दिला आहे.

 

अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि वास्तू सजावटकार अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा सोमय्या यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? असा सवालही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली होती

Exit mobile version