Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी

जळगाव, प्रतिनिधी | जातीच्या चौकटीत बहुजन क्रांतिवीरांच्या पराक्रमाचे मोजमाप करणाऱ्या सामाजिक व्यवस्थेत इतिहासाचे सत्यशोधन करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास क्रांतिगुरू लहुजी साळवे यांचा पराक्रमी इतिहास समाजासमोर येण्यास मदत होईल असे विचार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले.

 

पत्रकार भवन येथे आज रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त लहुजी ब्रिगेड संघटनेने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी जातीमुळे विषमतेची पकड समाजाला घट्ट बसल्याने महापुरुषांना आपापल्या जातीत मर्यादित ठेवले गेले आहे असे जळजळीत वास्तव मांडले. संविधान जागर समितीचे संयोजक भारत ससाणे यांनी आपले विचार व्यक्त करतांना देशात समता व बंधुत्व टिकवून ठेवायचे असेल तर संविधानाच्या रक्षणासाठी ठामपणे उभे रहावे लागेल असे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अंभोरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, कॉस्ट्राईब संघटनेचे रमेश सोनवणे,माजी नगरसेवक सुनील माळी, रमेश कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्य शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कारप्राप्त रामचंद्र पाखरे यांना गौरव करण्यात आला.

प्रास्ताविक अरुण खरात यांनी केले.सूत्रसंचालन निलेश बोरा तर आभार संजय अंभोरे यांनी मानले. यावेळी शिवसेनेच्या शहर उपप्रमुख नीलू इंगळे, वाय जी. पाटील, शेरखान, फिरोजा शेख, यास्मिन शेख इरफान, शेरखान,गोपी मराठे, हरीश कुमावत, रमेश बाऱ्हे, चंद्रकांत नन्नवरे, सागर गवळी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यशस्वितेसाठी आशा अंभोरे,विमल मोरे,सुनील चौधरी,शेख शाकीर शेख अजीज,शेख आशिक शेख मुस्तफा, नामदेव मोरे,सौ. मालन तडवी, शारदा तायडे, अशोक पारधे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version