Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, डिनो मोरियाला गुंतवण्यासाठी बळजबरी

मुंबई: वृत्तसंस्था । एनसीबीने माझी सातत्याने छळवणूक केली आणि अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांना अमलीपदार्थांच्या प्रकरणात गुंतवण्यासाठी बळजबरी केली, असा धक्कादायक जबाब अटक आरोपी क्षितिज प्रसादने विशेष एनडीपीएस कोर्टात नोंदवला.

धर्मा प्रॉडक्शनची उपकंपनी धर्माटिक एंटरटेन्मेंटचा माजी कार्यकारी निर्माता असलेल्या क्षितिज प्रसादला एनसीबी कोठडीची मुदत संपल्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर हजर केले. तपास यंत्रणेच्याविरोधात काही तक्रार आहे का, अशी विचारणा न्यायाधीशांनी केली. त्यावेळी प्रसादने जबाबात कोर्टाला ही माहिती दिली. त्यानंतर कोर्टाने संबंधित तपास अधिकाऱ्याला हजर राहण्याचे निर्देश दिले. मात्र, त्या अधिकाऱ्याला कोरोनाची लक्षणे असल्याने ते रुग्णालयात आहेत, असे एनसीबीच्या वकिलांनी सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी प्रसादला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

क्षितिज प्रसादकडून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर थेट आरोप करण्यात आले. ‘दिग्दर्शक करण जोहर आणि त्यांच्या धर्मा प्रॉडक्शन्स कंपनीतील अनेकांची नावे जबाबात नोंदवण्यासाठी वानखेडे यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणला, थर्ड डिग्रीचाही वापर केला. मला पहिल्यांदा २७ सप्टेंबरला न्यायदंडाधिकारी न्यायालयात एनसीबी कोठडी मिळवण्यासाठी हजर करण्यात आले तेव्हा मी न्यायाधीशांना छळवणुकीविषयी सांगितले. न्यायाधीशांनी ते नोंदीवर घेतले आणि मला ३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली.

नंतर समीर वानखेडे यांनी पुन्हा माझा अतिरिक्त जबाब नोंदवून त्यात माझ्या मनाविरुद्ध त्यांना वाटेल ते बऱ्याच गोष्टी घुसडल्या आणि त्यावर पुन्हा दबाव आणून माझी स्वाक्षरी घेतली. त्यावेळी पुन्हा एकदा धर्मा प्रॉडक्शन्समधील अनेकांची नावे जबाबात घेण्याची सक्ती त्यांनी केली. त्याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डिनो मोरिया यांनाही अडकवण्यास त्यांनी सांगितले. मी त्यास नकार दिला. तेव्हा आमचे ऐकले नाही तर तुझी पत्नी आणि कुटुंबीयांनाही यात अडकवू, असे वानखेडे यांनी धमकावले’, असा क्षितिजचा आरोप आहे.

क्षितिज प्रसादचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांनी आज कोर्टाला माहिती देऊन क्षितिज प्रसादचे लेखी म्हणणे सादर केले. क्षितिजने साक्षीदाराच्या पिंजऱ्यात जाऊन माहिती दिल्याचे मानेशिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version