Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रजनीकांत ३१ डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा

चेन्नई : वृत्तसंस्था । तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली.

त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं. सोमवारी त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. रजनीकांत यांच्या समर्थकांनी त्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता त्याच वेळी ही भेट झाली होती. नुकतेच तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना त्यांच्या राजकारणापासून लांब राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

दरम्यान, चर्चा केल्यानंतरच रजनीकांत यांनी राजकीय पक्षाचा विचार केला आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत.

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते.

Exit mobile version