Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगी पंतप्रधान झाल्यास धार्मिक एकताही धोक्यात येईल — रामचंद्र गुहा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । वेटींग इन विंग्स म्हणजेच भरारी घेण्यास तयार असणारा पक्षी अशा अर्थाच्या एक लेखामध्ये योगी पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकताही धोक्यात येईल असं  प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी म्हटलं आहे

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सध्याचे गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान पदाचा दावेदार असण्याची शक्यता कमी असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान पदी विराजमान होण्याची अधिक शक्यता असल्याचे मत प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे. या लेखामध्ये गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यामधील साम्य आणि फरक यावर बोलताना मोदींपेक्षा योगींचे नेतृत्व देशातील सामाजिक एकता बिघडवण्याचं काम करेल अशी भीती व्यक्त केली आहे.

 

रामचंद्र गुहा यांनी लेखाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असणारे अमित शाह हे मोदींचे वारसदार होऊन पंतप्रधान पदाची गादी संभाळतील असं २०१९ पर्यंत सर्वांनाच वाटत होतं असं नमुद केलं आहे. मात्र २०२० च्या शेवट पर्यंत योगी आदित्यनाथ हे अधिक जोमाने पुढे आले असून धार्मिक मुद्द्यांसंदर्भातील त्यांच्या धोरणांंची अंमलबाजवणी कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्याकडूनही नवीन कायदा लागू करुन केली जात आहे. हे एकप्रकारे योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व येडियुरप्पा आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या नेत्यांनी मान्य केल्यासारखं असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं आहे. राजकारणामध्ये टीकून राहण्यासाठी योगींप्रमाणेच टोकाचं राजकारण करणं काळाची गरज असल्याचं या नेत्यांना कळालं आहे, असंही या लेखात म्हटलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यामधील साम्य सांगताना दोन्ही नेते हे एकाधिकारशाहीच्या मार्गाने काम करण्यासाठी ओळखले जातात, असं गुहा म्हणाले आहेत. दोन्ही नेत्यांनी विरोधकांना संपवण्यासाठी पोलीस यंत्रणा आणि सरकारी यंत्रणांचा वापर केल्याचे दाखले सापडत असल्याचं गुहा सांगतात. त्याचप्रमाणे मोदींनी २०१३-१४ साली गुजरात मॉडेलच्या नावाखाली मत मागून सत्ता मिळवली. मात्र योगी यांच्याकडे अद्याप दाखवण्यासाठी युपी मॉडेल नसलं तरी त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम सुरु केलं आहे. मात्र हे काम धार्मिक स्तरावर एका विशिष्ट धर्माला विरोध करत राजकारण करण्याचं आहे, असं गुहा म्हणाले आहेत.

 

याच लेखामध्ये मोदी आणि योगीमध्ये फरकही असल्याचं गुहा यांनी म्हटलं आहे. मोदी किमान सबका साथ सबका विकास असं म्हणतात, मेट्रोत एखाद्या मुस्लिमासोबत फोटो तरी काढतात. मात्र योगी असलं काही करत नाहीत. हिंदू हे इतर कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या आणि खास करुन मुस्लीमांपेक्षा वरचढ आहेत असं योगी समजतात, असा उल्लेख या लेखात आहे. योगी यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना स्थापन केली असून हिंसा , दंगल आणि इतर प्रकरणांमध्ये या संघटनेविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आज योगी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ही संघटना कार्यरत आहे, असं गुहा यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे एखादी हिंदुत्वावादी संघटना स्थापन करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले योगी एकमेव नेते असल्याचं गुहा सांगतात.

 

मोदी जेव्हा २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यात अनेक कंपन्या आल्या होत्या आणि उद्योगवाढीचं वातावरण तयार झालं होतं. मात्र योगींच्या काळामध्ये २०१७ मध्ये असं काही घडलं नाही. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणारं उत्तर प्रदेश राज्य आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागसलेलं आहे. राज्याची हीच प्रतिमा अधिक ठसठशीत करण्याचं काम योगींनी मागील काही वर्षात केल्याचा टोला गुहा यांनी लागवला आहे.

 

योगी आदित्यनाथ हे पुढील निवडणुकांमध्ये प्रचाराची धुरा हाती घेऊन उतरले तरी ते आणि भाजपा आता देशातील लोकांना कोणत्या ‘अच्छे दिन’ची स्वप्न दाखवणार?, असा प्रश्न गुहा यांनी उपस्थित केला आहे. तरुण भारतीयांना नोकऱ्या, समृद्धी आणि सुरक्षेसंदर्भातील स्वप्न दाखवण्याचं धाडस हिंदू युवा वाहिनीसारखी तरुणांचा छळ करणारी संघटना स्थापन करणारा नेता दाखवेल का?, असंही गुहा यांनी विचारलं आहे.

 

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी जगभारतील अनेक देशांमध्ये दौरे करुन तेथील नेत्यांना भारताकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना संमिश्र यश मिळालं. मात्र योगी अदित्यनाथ पंतप्रधान झालेत तर जगातील इतर देश त्यांच्याबद्दल आणि भारताबद्दल काय विचार करतात याबद्दल त्यांना फारशी चिंता नसेल. देशामध्ये आपण अधिक शक्तीशाली होणं हेच त्यांचं एकमेव ध्येय असेल. खास करुन राजकीय, वैचारिक आणि धार्मिक मतांशी आपल्याशी सहमत नसणाऱ्यांविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार असेल असं गुहा म्हणतात.

 

लेखाच्या शेवटी गुहा यांनी मोदी, योगी आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना केलीय. काही महिन्यांपूर्वी मी माझ्या एका लेखामध्ये आताच्या आणि माजी पंतप्रधानांच्या कामासंदर्भात बोलताना सत्ता केंद्रीकरण आणि नियंत्रण यासंदर्भात नरेंद्र मोदी हे स्टेरॉइड घेतलेल्या इंदिरा गांधी आहेत असं म्हटलं होतं. तर आता आदित्यनाथ पंतप्रधान झाल्यावर ते स्टेरॉइड घेतलेले नरेंद्र मोदी ठरतील, असा टोला गुहा यांनी लगावलाय.  सात वर्षामध्ये गुजरात मॉडेलमुळे देशातील सामाजिक आणि संस्थात्मक स्वातंत्र्य जपणाऱ्या गोष्टींवर नकारात्मक पद्धतीचा दिर्घकालीन परिणाम झाला आहे. मात्र युपी मॉडेल आल्यास हे पूर्णपणे उद्धवस्त होईल, अशी भीती गुहा यांनी व्यक्त केलीय.

Exit mobile version