Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा ; आयएमएचं मोदींना पत्र

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आयएमएनं आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहीलं आहे. योगगुरु रामदेव यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

 

योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यातील वाद शमण्यची चिन्हं दिसत नाही. अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर टीकेचा भडीमार केल्यानं आयएमएने आक्षेप नोंदवत योगगुरु रामदेव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 

“योगगुरु रामदेव यांच्याकडून लसीकरणाबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. एका व्हिडिओत त्यांनी १० हजार डॉक्टर आणि १ लाख लोकं कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन मृत पावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करावा”, अशी मागणी आयएमएनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

 

 

आयएमएच्या उत्तराखंड शाखेनेही योगगुरु रामदेव यांना नोटीस पाठवली आहे. अब्रुनुकसानीसाठी १ हजार कोटींची भरपाई द्यावी लागेल, असं या नोटीसीमध्ये सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर केलेल्या टीकेप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. जर १५ दिवसात माफी मागितली नाही, तर १ हजार कोटी रुपयांचा दावा ठोकला जाईल असं यात सांगण्यात आलं आहे.

 

योगगुरु रामदेव यांनी एका व्हायरल व्हिडिओत कोरोनाच्या मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनीही त्यांच्या वक्तव्याप्रकरणी संताप व्यक्त करत विधान मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यानंतर योगगुरु रामदेव यांनी विधान मागे घेतलं होतं. मात्र वाद शमण्याऐवजी वाढतच चालल्याचं दिसत आहे.

 

Exit mobile version