Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवकांनी नेहरू युवा केंद्राच्या व्यासपीठाचा फायदा घ्यावा!

जळगाव, प्रतिनिधी । नशिबाने केवळ एक टक्का युवक यशस्वी होऊ शकतो तर ९९ टक्के युवक प्रयत्नांनी यशस्वी होतो. यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे नशीबाच्या विचारात अडकून आपण स्वतःची फसवणूक करू नका असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे आज रविवारी जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

शिवतीर्थ मैदान येथील पंचायत समितीच्या हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार उन्मेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भाजपा जळगाव जिल्हाअध्यक्ष तथा आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. व्यासपीठावर गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार पाटील पुढे म्हणले की, युवकांनो आपले ध्येय निश्चित करावे जो खेलेगा वही खीलेगा त्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवा. येत्या काळात कोरोना संपला की युवकांसाठी दोन दिवसीय नेहरू युवा केंद्राचे शिबीर आयोजित करू. जळगावचे केंद्र देशात सर्वोत्तम ठरेल यासाठी माझे प्रयत्न राहतील. सर्वांना आपल्या शालेय जीवनात चांगले व्यासपीठ उपलब्ध होत नाही त्यामुळे आपल्याला नेहरू युवा केंद्राचे उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे त्याचा चांगला फायदा करून घ्या.

पाहुण्यांचा परिचय भूषण लाडवंजारी यांनी करून दिला. प्रस्तावना करताना नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांनी सांगितले की, सध्या फिट इंडिया उपक्रम देशभर राबविला जात आहे. तुम्ही फिट राहणार तर मन फिट राहील. आपण स्वतः फिट रहा इतरांना प्रोत्साहित करा. नेहरू युवा केंद्र हा केंद्र शासनाचा उपक्रम असून तरुणांना घडविण्यासाठी नेहमी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात अशी माहिती देऊन त्यांनी प्रोजेक्टरवर काही स्लाइड्सच्या माध्यमातून नेहरू युवा केंद्रातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती नरेंद्र डागर यांनी दिली. सूत्रसंचालन विकास वाघ याने केले तर विनोद ढगे यांनी आभार मानले.

युवकांनी स्वतःला व्यसनांपासून दूर ठेवत शरीर तंदरूस्त ठेवावे : आ.भोळे
प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले की, आपण निसर्गाशी खेळलो म्हणून आज निसर्ग आपल्याशी खेळतो आहे. अगोदर मनुष्य प्लास्टिक बाहेर फेकायचा आता मनुष्याला प्लास्टिकमध्ये जाळावे लागत आहे. नेहरू युवा केंद्र व केंद्र सरकार आणि तरुणांमध्ये दुवा म्हणून कार्य करते. आपण समाजाचे देणं लागतो या उदात्त भावनेतून कार्य करा. प्रत्येकाने रोज शरीरासाठी तासभर वेळ द्यावा. घरी किंवा बाहेर जाऊन व्यायाम करा. ग्रामीण खेळ रांगडी खेळ होते. ते आज लुप्त होत चालले होते परंतु त्यापैकी काही खेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा जिवंत केले. तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे आणि स्वतःला तंदरूस्त ठेवावे, असे आवाहन आ.भोळे यांनी केले. तसेच सर्वप्रथम आपण जिंकायचं कुणाशी हे ओळखायला शिकावे. जर ते लक्षात आले तर आपल्याला आयुष्यात यश नक्की मिळेल. देश आपली आई आहे त्यामुळे आपल्या आईसाठी काही चांगले काम करताना कोण काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करा असे आ.राजुमामा भोळे यांनी सांगितले.

गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी सांगितले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासह नेतृत्वगुण विकास साधला जातो. नेतृत्व करीत एकमेकांना साहाय्य करायचे. ग्रामीण भागासाठी केंद्र सरकारचा इतका मोठा उपक्रम असेल तर त्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एखादा मोठा कार्यक्रम, स्पर्धा आयोजित करावी, अशी अपेक्षा गट विकास अधिकारी शशिकांत सोनवणे यांनी व्यक्त केली.

विनोद ढगे यांनी सांगितले की, संपूर्ण भारतात एक सामाजिक चळवळ उभारण्याचे काम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागात पोहचविण्याचे काम या माध्यमातून सुरू आहे. कोरोना काळात देखील स्वयंसेवकांनी जनजागृती करण्याचे काम मोठ्याप्रमाणात केली. तरुणांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, स्वतःचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सदृढ राहावे या उद्देशाने नेहमी विविध उपक्रम नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येतात.

कार्यक्रमाचे उद्घाटन खा.उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, जेव्हा जेव्हा युवा शब्द येतो तेव्हा तो आपला शब्द वाटतो. युवा शब्दाने एक वेगळी प्रेरणा मिळते. एका बाजूला ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान घेतांना आपण आव्हान देखील स्वीकारायला हवे. देश खऱ्या अर्थाने जगात पुढे जाणार असेल तर तो युवकांच्या बळावर जाईल त्यामुळे आपली जबाबदारी फार महत्वाची आहे. नेहरू युवा केंद्रासोबत काम करताना आपण स्वतः उत्स्फूर्त असायला हवे. शेकडो तरुणांना नेतृत्त्व, प्रेरणा देणारे आपण विविध संस्थांचे प्रतिनिधी आहोत. आपण आपल्या आणि युवकांच्या विकासासाठी एक ऍक्शन प्लॅन तयार करा. घरात बसून स्वप्न पूर्ण होत नाही, सहभाग घ्या, ध्येय निश्चित करा. आपण जबाबदारी घ्यायला हवी, दोन पाऊले पुढे जायला हवे. आपण मनाने तरुण असायला हवे जर मनाने थकलेले असाल तर काहीही साध्य होऊ शकत नाही, असे खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले.

३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप
नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मान्यवरांच्या हस्ते जिल्ह्यातील ३० युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. त्यात बुद्धिबळ पट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, नेट, बॅटमिंटन रॅकेट, शटल कॉक यांचा समावेश होता. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक आकाश धनगर, संजय बाविस्कर, शाहरुख पिंजारी, हितेश ओत्सवाल, शिवदास कोचुरे, रणजितसिंग राजपूत, दीपक सपकाळे, प्रशांत बाविस्कर, नाना सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version