Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युनियन बँकेतर्फे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ‘स्नेह मेळावा’ उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतातील मोठ्या राष्ट्रीयकृत बँकांपैकी एक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या जळगाव जिल्ह्यात अनेक शाखा असून त्यापैकी काही शाखा तर १९६७ सालापासून कार्यरत आहेत. युनियन बँक ऑफ इंडियाच्या जळगाव जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये काम केलेले निवृत्त कर्मचारी एकत्र येऊन त्यांनी नुकताच “स्नेह मेळावा” आयोजित केला.

वय वर्षे ६० पासून वय वर्षे ८३ असे सर्व निवृत्त कर्मचार्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दिली. या सर्वांनी बॅंकेचा व्यवसाय वाढविला आहेच शिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ गरिबांना मिळवून देण्याचे मोठे राष्ट्रीय कार्य देखील केले आहे. हे सर्व कर्मचारी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर स्थायिक झाले आहेत. परंतु जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी लांबून प्रवास करुन जळगावला आले. यातील अनेकांनी बॅंकेत मोठ्या पदावर काम केलेले आहे. परंतु “स्नेह मेळावा” साठी सर्व पदे वगैरे बाजुला ठेवून हे निवृत्त कर्मचारी एकमेकात मिसळले. या मेळाव्यात पंचावन्न ते साठ लोक सहभागी झाले होते. ऐंशी लोकांनी सहभाग नोंदविला होता परंतु काही कारणास्तव सर्वांना येता आले नाही.

जळगाव शहरात राहणारे निवृत्त कर्मचारी नंदू कुळकर्णी आणि किशोर  सांखला यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. हे दोघे अनेक सामाजिक कामात भाग घेतात व निवृत्त कर्मचारी बंधु भगिनींना मदत करतात. त्यांना रमेश रोकडे , चंद्रशेखर कुलकर्णी व विलास यालकर पुणे, अनिल देशमुख नासिक, विजय जैन ठाणे आणि चंद्रकांत खानझोडे अमरावती यांनी मदत केली. अनेक वर्षांनी भेटल्यामुळे अनेकांनी  अक्षरशः एकमेकांना मिठी मारली. सुखदुःखाच्या गोष्टी केल्या. बॅंकेचे माजी सरव्यवस्थापक एस जी वखरे यांनी आनंद व्यक्त करतांना सांगितले की ” अशा मेळाव्यांची आज गरज आहे, जीवाभावाचे सहकारी भेटल्याने जो आनंद मिळतो तो शब्दात व्यक्त करता येत नाही. ही एक संजीवनी आहे.” मा. सरव्यवस्थापक सतीश वराडपांडे, विलास पोतदार, यांनी देखील असे उर्जा निर्माण करणारे स्नेह मेळावे सर्वत्र आयोजित व्हावे असं मत व्यक्त केले.

नंदू कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले तर सर्वांचे स्वागत अनिल देशमुख आणि चंद्रकांत खानझोडे यांनी केले. दीप प्रज्वलन, ‘इतनी शक्ती दे दाता’ ही प्रार्थना आणि स्वर्गवासी झालेल्या निवृत्तांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम सुरु झाला. रमेश रोकडे यांनी फॅमिली पेन्शन संबधी माहिती दिली. जेष्ठ नागरिक अनेकदा सायबर गुन्ह्याला बळी पडतात. उतारवयात अनावश्यक कर्ज काढतात किंवा जामिन राहतात. या गोष्टी टाळाव्यात असेही रमेश रोकडे यांनी आवर्जून सांगितले. मृत्युपत्राविषयी माहिती त्यांनी दिली.

सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे बॅंक कर्मचारी पेंशन अपडेट होत नसल्याने जुन्या पेंशनरांना आजच्या हिशेबाने तुटपुंजे पेंशन मिळते. माजी सरव्यवस्थापक विजय जैन यांनी पेंशन अपडेशन बद्दल माहिती दिली. चंद्रकांत खानझोडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सर्वांना पुढे येण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम अतिशय रंगला. त्यात प्रत्येकाने उत्साहाने भाग घेतला. पाहुणांसाठी खास खानदेशी आणि भारतीय जेवणाचा “उत्तम भोज” येथे उत्तम बेत होता. जेवण आणि एकंदरीत व्यवस्था सर्वांना आवडली. दुपारच्या सत्रात  चंद्रकांत भंडारी यांनी ” आनंदी जीवनाची गुरुकिल्ली” या कार्यक्रमात ..

निवृत्त झाल्यावर देखील सामाजिक कामात व्यस्त असणारे अशोक पाटील, सरपंच भालशिव, निःशुल्क विवाह मेळावे आयोजित करणारे निशिकांत गंधेवार, बालेवाडी पुणे येथील सर्व गृहनिर्माण संस्थांना एकत्र आणून त्यांचे वेल्फेअर फेडरेशन स्थापन करणारे रमेश रोकडे, पेंशनरांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करणारे चंद्रकांत खानझोडे आणि अनिल देशमुख यांच्या कार्याचा परिचय करून दिला गेला. सर्वांनी त्यांचे कौतुक केले.

निवृत्त कर्मचाऱ्यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे आरोग्य विमा. याबद्दल विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन अनिल देशमुख यांनी केले. समारोपाचे भाषणात माजी सरव्यवस्थापक एस जी वखरे यांनी आयोजकांचे आभार मानले आणि उत्कृष्ट सोयीबद्दल समाधान व्यक्त केले.

किशोर सांखला यांनी सर्वांचे आभार मानले. सर्वांनी नंतर बँकेच्या जळगाव आणि शेंदुर्णी शाखेस भेट दिली. दोन्ही शाखेतील विद्यमान कर्मचाऱ्यांनी सर्वांचे उत्साहात स्वागत केले.
अतिशय गोड आठवणी घेऊन सर्व आपापल्या घरी पोहचले.

 

Exit mobile version