‘या’ शिक्षकांना विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम करण्याची संधी मिळणार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ज्या शिक्षकांनी उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनात सहभाग घेतला आहे. अशा शिक्षकांना ‍विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम करण्याची संधी प्राधान्याने देण्याचा निर्णय कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

 

विद्यापीठाच्या विविध परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लावण्याबाबत विद्यापीठ अधिक गांभिर्याने उपाय योजना करीत आहे. विद्यापीठामार्फत महाविद्यालय संलग्निकरण समित्या, मुलाखतींसाठी विषय तज्ज्ञ आदी विविध समित्यांवर विद्यापीठ संलग्नित शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात. या समित्यांवर शिक्षकांना पाठविण्याचा अधिकार विद्यापीठाकडे आहे. त्यामुळे जे शिक्षक उत्तर पत्रिकांच्या मूल्यांकनाच्या कामकाजात सहभागी होतील त्याच शिक्षकांना विद्यापीठाकडून जाणाऱ्या विविध समित्यांवर प्राधान्य देण्याचा निर्णय बैठकीत झाला. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. १८ मे रोजी ही बैठक झाली.

 

परीक्षेतील कॉपीचे प्रमाण रोखणेबाबत या बैठकीत चर्चा झाली. दक्षता पथकांना कॉपी निर्मूलनासाठी कडक उपाय करणेबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. ज्या महाविद्यालयात दहा किंवा ज्यापेक्षा जास्त कॉपी केसेस आढळून आल्या तर त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विद्यापीठाकडून पत्र दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेश पत्रावर (हॉल तिकीट) गैरप्रकार केल्यास होणाऱ्या शिक्षेची तरतूद नमूद करण्यात येणार आहे.

Protected Content