Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल शहरात संचारबंदीच्या काळात वाळूची तस्करी : अधिकारी निद्रावस्थेत

यावल, प्रतिनिधी । संपूर्ण राज्यात करोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आले असून याच संधीचा फायदा घेऊन काही वाळूमाफिया चोरट्या मार्गाने वाळूची तस्करी करून चढ्त्या भावाने विकत असल्याचे प्रकार यावल शहरात व परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असून या सर्व प्रकाराकडे महसूल प्रशासनाच्या स्थानिक अधिकार्‍यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवार २४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह संचारबंदीच्या बंदोबस्तावर असतांना यावल शहरातील बाबा नगर परिसरातील हाडकाई नदीच्या पात्रात विना नंबर प्लेट असलेले ट्रॉलीने अवैध मार्गाने वाळू वाहतूक करत असताना निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी सदरचे विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ताब्यात घेऊन महसूल प्रशासनाच्या हवाली केले. दरम्यान, विनापरवाना अवैध मार्गाने वाळू वाहतूक करण्यासंदर्भात संबंधित ट्रॅक्टर मालकास महसूल प्रशासनाकडून सुमारे १ लाख २५ हज़ार रुपयांचा दंड आकारण्याची नोटीस बजावण्यात आली. संचारबंदीच्या आदेशाला न जुमानता मंदीच्या काळातअशाप्रकारे वाळू माफिया कडून शहरातील व परिसरातील बांधकाम ठेकेदारांना चढ्या भावाने वाळु विक्रीचा व्यवसाय करत असून महसूल प्रशासनाने या प्रकारास प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत अशी मागणी यावल शहरातील व परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात यावलचे तहसीलदार जितेंद्र कुवर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वाळू माफिया प्रतिबंध घालण्यासाठी दक्ष राहण्याचे आदेश दिले आहेत.

Exit mobile version