यावल पंचायत समितीत पंचायत राज समितीने घेतला कामाकाजांचा आढावा

यावल प्रतिनिधी । पंचायतराज समितीने येथे यावल पंचायत समितीत २०१७ -१८या वर्षासंबंधी कामकाज आढावा बैठक आज घेण्यात आली.

बैठकीत रोजगार हमी योजनांची कामे, तालुक्यातील आदीवासी वस्ती पाड्यांवर वाढलेली कुपोषणग्रस्त बालकांची संख्या, शैक्षणीक शाळा विद्यार्थी पटसंख्या या विषयांवरील उपस्थित झालेल्या प्रश्नावर सर्व विभागातील अधिकारी वर्गाला समिती समोर उत्तर देतांना चांगलेच घाम फुटला होता. याशिवाय घरकुल योजनांची झालेली अंमलबजावणी अशा विविध प्रश्नावर संबधीत अधिकारी यांच्याकडुन समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पंचायतराज समितीने नाराजी व्यक्त केली.

दरम्यान यावल तालुक्यात पंचायत राज समितीने सर्वप्रथम  प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी भेट दिली नाही.व याच काळात या आरोग्य केंद्रावरील औषधाच्या साठ्याची तपासणीही करण्यात आली नाही. अशी माहीती पंचायत राज समितीसमोर देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचे नेतृत्वाखाली तीन सदस्यीय पंचायत राज समिती आज आली होती. समितीत आ. अनिल पाटील यांच्यासह आमदार डॉ.देवराव होळी ( गडचिरोली), आ. माधवराव जवळगावकर ( नांदेड) यांचा समावेश होता. समितीने सर्वप्रथम तालुक्यातील डांभूर्णी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी केली. यावेळी पं.स. सभापती पल्लवी चौधरी, व अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर किनगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधकामाची पाहणी केली. वढोदे प्रगणे यावल येथे जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, व सरपंच संदीप सोनवणे यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. येथे पंचायत समितीच्या नविन इमारतीचे सभागृहात पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, व उपसभापती योगेश भंगाळे यांनी समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती  रविंद्र पाटील, यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील ,जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव, जिल्हा परिषदचे माजी सदस्य तथा खरेदी विक्री संघाचे संचालक रामदास गोंडु पाटील ( नाना ) , यांनी देखील समिती सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर सभेच्या कामकाजास सुरवात झाली. गटविकास अधिकारी डॉ.एन.एस. पाटील यांनी सन२०१७-१८या वर्षाचा थोडक्यात आढावा दिला. समितीने २०१७ -१८का कालावधीतील बैठकीत शासकीय पातळीवरील पंचायत समिती अंतर्गत झालेल्या कामांचा घेतला आढावा बैठकीत घेण्यात आला , पंचायत राज समितीद्वारे एकूण २८ प्रश्नावली वर उपस्थित अधिकारी वर्गाकडून आढावा घेण्यात आला. बैठकीच्या कामकाजात विधिमंडळ अधिकारी शशिकांत साखरकर, बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र राऊत, प्रतीवेदक मैत्रेय कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.

 

आढावा बैठकीनंतर तालुक्यातील राजोरा गाव १०० टक्के कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याबाबत पंचायतराज समिती प्रमुख आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते ग्रामपंचायत सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच दिनेश पाटील व सदस्य यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी गिरधर पाटील उपस्थित होते.

बैठकीनंतर पंचायत राज समितीकडे काही रोजगार हमीची कामे , आसराबारी कुपोषणग्रस्त बालकाचा बळी , सातत्याने कुपोषणग्रस्त बालकांची वाढलेली धक्कादायक आकडेवारी या विषयावर पदाधिकारी ग्रामस्थांनी समिती सदस्यांकडे निवेदने दिली. या विषयावर उद्या होणाऱ्या जिल्हा परिषद सिईओच्या बैठकीत नागरीकांनी दिलेल्या तक्रारींवर चर्चा करून तात्काळ निर्णय घेण्यात येणार असल्याचे पंचायतराज समितीचे गट प्रमुख आमदार अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतले .

Protected Content