Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

… यापेक्षा मेलेलं बरं ; पिता इंद्रजित चक्रवर्तींची प्रतिक्रिया

मुंबई वृत्तसंस्था । रियाविरोधात झालेल्या कारवाईवर तिच्या वडिलांनी रोष व्यक्त केलाय. ‘कोणतेही पुरावे नसताना तिला फाशीवर चढवण्यात येत आहे. तसंच कोणताही बाप आपल्या लेकीवर अन्याय झालेला पाहू शकत नाही. यापेक्षा मेलेलं बरं’, असं इंद्रजीत चक्रवर्ती यांनी म्हटलं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक करून कोर्टात हजर केलं. कोर्टानं रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी रियाच्या जामिनासाठी अर्ज केला होता. कोर्टानं हा अर्ज फेटाळून लावला. रियाला २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. जामिनासााठीचा अर्ज कोर्टानं फेटाळल्यानंतर रियाचे वडिल इंद्रजीत चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दरम्यान, एनसीबीनं कोर्टात रियाच्या जामिनाला विरोध केला त्यांमुळं तिला काल रात्री घरी जाता आलं नाही. तिला एनसीबीच्या कार्यालयातच रात्री मुक्काम करावा लागला . तिथून तिची आज सकाळी तुरूंगात रवानगी केली गेली.

एनसीबीनं कोर्टात रियाच्या जामिनाला विरोध करत युक्तिवाद केला. रिया चक्रवर्ती आरोपी आहे. तिला जामीन दिल्यास परिणाम होऊ शकतो. रियानं महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर तपास करणं आवश्यक आहे.

रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तिच्या जामिनासाठी बाजू मांडली. रियानं चौकशीत सहकार्य केलं आहे. एनसीबीनं रिमांड मागितलेली नाही. कारण एनसीबीनं चौकशी पूर्ण केली आहे. रियानं स्वतःहून ड्रग्स घेतले नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून तिनं ते पुरवले आहे. यामुळं तिला जामीन मिळाला पाहिजे. गरज पडेल तेव्हा ती पुन्हा चौकशीत सहकार्य करेल, अशी बाजू रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी मांडली.

काही दिवसांपूर्वी रियाचा भाऊ शौविकला अटक झाल्यानंतर मौन तोडत इंद्रजीत चक्रवर्ती यांनी आपल्या मुलाच्या अटकेबद्दल संपूर्ण भारताचं अभिनंदन केलं.आपल्या निवेदनात ते म्हणाले की, माझ्या मुलाला अटक झाली आहे आणि आता कदाचित पुढील क्रमांक माझ्या मुलीचा आहे.न्यायाच्या नावाखाली एका मध्यम वर्गीय कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यात आलं. एनसीबीनं इंद्रजीत चक्रवर्ती यांचीही चौकशी केली होती.
==================

Exit mobile version