Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यशस्वी वृत्तनिवेदकासाठी ज्ञानसाठा, योग्य सादरीकरण आणि प्रभावी शब्दफेक आवश्यक – निलेश खरे

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दूरचित्रवाणीसाठी वृत्तनिवेदक म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानसाठा, योग्य सादरीकरण आणि प्रभावी शब्दफेक हे त्रिगुण अंगीकारणे आवश्यक आहे. असे मत झी 24 तास वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी व्यक्त केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील माध्यमशास्त्र प्रशाळेतर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दूरचित्रवाणी वृत्तनिवेदन : तंत्र आणि कौशल्य ‘ या विषयावर वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह मुख्य आयोजक माध्यमशास्त्र प्रशाळेचे विभागप्रमुख प्रा.डॉ. सुधीर भटकर, डॉ. गोपी सोरडे, डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ. रोहित कसबे उपस्थित होते.

पुढे बोलताना खरे म्हणाले की, पत्रकारिता आल्याशिवाय वृत्तनिवेदक होता येत नाही. दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात वृत्तनिवेदक म्हणून करिअर करायचे असेल तर आधी आपल्याला पत्रकारितेचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे. याशिवाय वाचन, आत्मविश्वास, आवाज, भाषेवरील प्रभूत्व, लोकांशी संवाद, विषय समजावून घेणे, कमी वेळेत योग्य मांडणी करणे या गोष्टी दूरचित्रवाणीच्या वृत्तनिवेदकास आवश्यक आहे. त्यामुळे विद्याथ्र्यांनी या गोष्टी अंगीकारून वृत्तनिवेदनातील नवनवीन तंत्र आणि कौशल्य आत्मसात केली पाहिजेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉ.विनोद पाटील म्हणाले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी सर्जनशीलता, कौशल्य, अभ्यासूवृत्ती, संयम, क्षमता या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. त्यामुळे ज्यांच्या अंगी हे गुण आहेत ते या क्षेत्रात निश्चितपणे यश संपादन करू शकतात. दूरचित्रवाणी या माध्यमात वृत्तनिवेदकांना अतिशय महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. त्यामुळे या माध्यमात वृत्तनिवेदकांना अतिशय महत्व आहे. त्यामुळे या वृत्तनिवेदक व्हायचे असल्यास विद्याथ्र्यांनी वरील गुणांसोबतच तंत्र आणि कौशल्याचा वापर करावा असे शेवटी त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात विभागप्रमुख डॉ. सुधीर भटकर यांनी आजच्या युगामध्ये दूरचित्रवाणी माध्यमाचा अधिक प्रभाव असल्याचे सांगून वेबसंवादाबाबतची भूमिका विशद केली. वक्त्यांचा परिचय डॉ.गोपी सोरडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन धरती चौधरी हिने केले. आभार प्रांजल जगताप हिने मानले. यशस्वितेसाठी रंजना चौधरी, प्रकाश सपकाळे, प्रल्हाद लोहार, यांनी परिश्रम घेतले. या वेबसंवादात पुणे येथील जनसंज्ञापण आणि वृत्तविद्या विभागाचे प्रा.डॉ.संजय तांबट, नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र प्रशाळेचे डॉ.कैलास यादव, मु.जे महाविद्यालयाचे सुभाष तळेले, संदीप केदार, नुतन मराठा महाविद्यालयाचे डॉ.दिलीप चव्हाण, विद्यापीठातील डॉ.रणजीत पारधे, डॉ.तुषार रायसिंग, नंदूरबार येथील राहुल ठाकरे यांच्यासह राज्यभरातील पत्रकारितेचे प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते.

Exit mobile version