Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यंदा वर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा?

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीच्या शेवटी  अमेरिकेत वॉशिंग्टन डी. सी.मध्ये पहिल्यांदाच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेण्याची शक्यता  आहे.

 

भारत आणि अमेरिकेतील परिस्थिती कोरोनामुळे बिघडली नाही तर मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. भारत तसेच आमेरिकेतील अधिकारी या भेटीच्या नियोजनासंदर्भात चर्चा करत असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडन यांच्यादरम्यान आतापर्यंत दोनदा फोनवरुन चर्चा झालीय. काही महिन्यांमध्ये मोदी आणि बायडन यांनी दोन वेळा वेगवेगळ्या बैठकींमध्ये व्हर्चूअल माध्यमातून सहभाग नोंदवला  मात्र मोदींनी दौरा केला तर देशाचे प्रमुख म्हणून दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल. अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौर ठरेल.

 

बायडन प्रशासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना वॉशिंग्टन डिसीमध्ये आमंत्रित करण्याची योजना दिल्लीला कळवली आहे. या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये हा दौरा आखण्यात येण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूकडून यासंदर्भात चर्चा झालीय. मात्र दोन्ही देशांमधील कोरोना परिस्थिती कशी असेल यावर हा दौऱ्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. दोन्ही देशांमधील  परिस्थिती फार गंभीर नसेल तरच दौऱ्याबद्दल पुढील विचार केला जाईल असं दिल्लीतील सुत्रांनी सांगितलं आहे.

 

क्वाड देशांचे प्रमुखही या दौऱ्यादरम्यान एकत्र येऊ शकता. बायडन यांनी क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेण्यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याचे वृत्त आहे. जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही बायडन यांच्याकडून याच कालावधीमध्ये अमेरिकेच्या भेटीचं आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.

 

व्हाइट हाऊसचे भारत-प्रशांत विभाग धोरण सल्लागार कुर्त कॅम्पबेल म्हणाले , “क्वाड देशांच्या प्रमुखांची प्रत्यक्षात बैठक घेण्याची आमचा महत्वकांशी प्रयत्न आहे. ही बैठक वॉशिग्टनमध्ये घेण्याचा प्रयत्न असून सर्व नेते प्रत्यक्षात उपस्थित राहतील असा आमचा प्रय़त्न सुरुय,” अमेरिकन सुरक्षा परिषदेमध्ये भारत प्रशांत महासागरातील सुरक्षेसंदर्भात बोलताना कॅम्पबेल यांनी ही माहिती दिलीय.

 

मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया, भारत, जपान व अमेरिका या देशांनी क्वाड गटाची पहिली व्हर्चूअल बैठक घेतली होती.  २००७ साली क्वाड देशांच्या समुहाची स्थापना झाली होती. त्यानंतर २०१७ पासून हा गट पुन्हा सक्रीय झालाय. चीनकडून होणाऱ्या आक्रमणांपासून लोकशाहीवादी देशांच्या संरक्षणासाठी आणि समान धोरणांसाठी या गटाची स्थापना करण्यात आलीय. भारत प्रशांत महासागर प्रदेशातील देशांमध्ये शांतता आणि सहकार्य टीकून राहण्यासाठी आणि चीनच्या अक्रमकतेला विरोध करण्यासाठी हा गट काम करतोय.

 

मोदी, बायडन, सुगा, मॉरिसन यांनी १२ मार्च रोजी ऑनलाइन माध्यमातून बैठक घेतली होती. अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये एकमत झालं आणि भविष्यातील विषयांवरही चर्चा झाली. जी सेव्हन गटातील राष्ट्रांची पुढील शुक्रवार ते रविवार अशी एक बैठक पार पडणार आहे. ब्रिटीश पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांच्या अध्यक्षेतेखाली साऊथ वेस्ट इंग्लंडमधील क्रॉनवेलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आलीय. मात्र देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी या बैठकीला हजर राहता येणार नाही असं सांगितलं आहे. असं असलं तरी बायडन, सुगा, मॉरिसन हे या बैठकीसाठी पुढील आठवड्यात ब्रिटनला जाणार आहेत.

 

भारत हा जी सेव्हन राष्ट्रांचा सभासद नाही. यामध्ये जपान, इटली, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, अमेरिका आणि ब्रिटनचा समावेश आहे. मात्र जॉन्सन यांनी मोदींना विशेष आमंत्रित म्हणून या बैठकीचं आमंत्रण दिलं होतं.

 

Exit mobile version