Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यंदाचा पावसाळा चारही महिने बरसणार ; रान आबादानी होणार !!

 

 

मुंबई :  वृत्तसंस्था । यावर्षी  जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसह अर्थव्यवस्थेला फायदा होईल. भारताची दोन तृतीयांश जनता शेतीवर अवलंबून आहे.

 

ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने यावर्षी सर्वसामान्य पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस  पडेल, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ऑस्ट्रेलियाचं हवामान खातं हे त्याच्या अचूक अंदाजासाठी जास्त प्रसिद्ध आहे. भारतीय विभागाकडून अद्याप हवामान विभागाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय एक्यूवेकर या वेदर कंपनीनेनदेखील भारतात यावर्षी दुष्काळ पडणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे.

 

भारतात अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते. यावर्षी  मान्सुन पूर्व काळात चांगला पाऊस पडला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. याशिवाय शेतकऱ्यांना त्यांचं शेत तयार करण्यासाठीही चांगली मदत होईल. याशिवाय त्यांना पाण्यासाठी लागणारा खर्चही वाचेल.

 

योग्य वेळी पेरणी झाली तर चांगले पीकं उगवण्याची आणि त्यापासून चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता वाढते.  तसं झालं तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अनेक भागात सध्या शेतकरी त्यांच्या शेतीला पेरणीसाठी तयार करत आहेत. मान्सून यावर्षी धोका देणार नाही, अशी वैज्ञानिकांनादेखील आशा आहे.

 

पाऊस कमी-जास्त पडला तर त्याचा थेट परिणाम खेड्या गावात राहणाऱ्या नागरिकांवर पडतो. त्यामुळे पाऊस चांगला किंवा सामान्य स्वरुपाचा पडला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळतो. कारण पावसाळ्यात पीकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. पावसाच्या पाण्यातून ती गरज भरुन निघते. पीकांना चांगलं पाणी मिळाल्याने उत्पन्न देखील चांगलं येतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा तर होतोच याशिवाय देशाची आर्थिक व्यवस्थाही सुधारते.

Exit mobile version