Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोहरम मिरवणुकीस परवानगी नाही-सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली । मोहरम मिरवणूक काढण्यासाठी परवानगी मागणार्‍या याचिकेवर निर्णय देताना आज सर्वोच्च न्यायालयाने, जनतेच्या आरोग्याबद्दल धोका घेऊ शकत नाही, असं सांगत मागणी फेटाळून लावली आहे.

मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका लखनौ येथील याचिककर्त्यांनं केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला.

न्यायालय म्हणाले, जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला करोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणार्‍या धोक्याचा विचार केला असता, न्यायालयानं सांगितलं.

त्यावर शिया समुदायातील बहुसंख्य लोक लखनौमध्ये वास्तव्याला आहेत, त्यामुळे केवळ लखनौसाठी परवानगी मिळेल का, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. मात्र याला देखील नकार देण्यात आला. याप्रकरणी न्यायालयानं अलहाबाद न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

Exit mobile version