Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोर्चामधील केवळ 5 व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय येथे दररोज विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, मोर्चा काढून निवेदन देण्यास येत असतात.निवेदन देण्यासाठी विविध संघटनेमार्फत कार्यालयात येऊन मोठमोठ्याने घोषणाबाजी करुन कार्यालयातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्याअनुषंगाने जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी १४ मार्च रोजी दुपारी २ वाजता एक परिपत्रक काढले असून याद्वारे निवेदन देण्याबाबत मार्गदर्शक सुचना जाहिर केल्या आहेत.

 

याअनुषंगाने संबंधित सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना पुढीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत. विविध व्यक्ती, राजकीय संघटना, अराजकीय संघटना, समूह यांनी निवेदन देण्याबाबत संबंधित पोलीस स्टेशन येथे निवेदन दिल्यानंतर संबंधित पोलीस निरीक्षक यांनी ज्या विभागास, कार्यालयास निवेदन देण्यात येणार आहे, त्या विभागाचे, कार्यालयाचे कार्यालय प्रमुख यांना किमान एक दिवस आधी कळविणे आवश्यक राहील. निवेदन देतांना मोर्च्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन त्या विभागात, कार्यालयात पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याची दक्षता घेण्यात यावी. मोर्चामधील केवळ 5 व्यक्तींना निवेदन देण्याची मुभा राहील. मोर्चा काढून निवेदन देतांना शासकीय कार्यालयात शांतता ठेवणे आवश्यक राहील. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, कार्यालयात उपस्थित नागरिकांना घोषणाबाजीमुळे त्रास होणार नाही, याबाबत संबंधितांना पूर्व सुचना देण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संघटना यांचेवर नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. असेही जिल्हादंडाधिकारी अमन मित्तल यांनी एका परिपत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version