Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे एसएमएस मिळवा; खान्देशात साडेतेरा लाख ग्राहक घेताहेत लाभ

जळगाव प्रतिनिधी । वीजबिलाचा तपशील तसेच वीजपुरवठा बंद असण्याचा कालावधी व इतर माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळवण्यासाठी जळगाव परिमंडलातील जवळपास साडेतेरा लाख ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदविला आहे. नव्याने नोंदणीसाठी तसेच आधी नोंदवलेला क्रमांक बदलण्यासाठी महावितरणशी संपर्क साधून सर्व वीजग्राहकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

जळगाव परिमंडलातील 16 लाख 53 हजार 418 वीजग्राहकांपैकी 13 लाख 33 हजार 302 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे. यात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर या वर्गवारीतील 13 लाख 4 हजार 550 ग्राहकांपैकी 10 लाख 91 हजार 830 ग्राहकांचा तर कृषिपंप वर्गवारीतील 3 लाख 48 हजार 868 ग्राहकांपैकी 2 लाख 41 हजार 472 ग्राहकांचा समावेश आहे. जळगाव मंडलात 9 लाख 64 हजार 144 वीजग्राहकांपैकी 8 लाख 36 हजार 923 ग्राहकांनी, धुळे मंडलात 4 लाख 42 हजार 518 वीजग्राहकांपैकी 3 लाख 43 हजार 788  ग्राहकांनी, तर नंदुरबार मंडलात 2 लाख 46 हजार 756 वीजग्राहकांपैकी 1 लाख 52 हजार 591 ग्राहकांनी महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवलेला आहे.

या ग्राहकांना वीजबिलाची माहिती, तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी, मीटर रीडिंग, बिल भरण्याची अंतिम तारीख ही माहिती ‘एसएमएस’द्वारे  पाठवण्यात येत आहे. परिमंडलातील 84 टक्के घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी झालेली आहे. असे असले तरीही ज्या ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक बदलायचा आहे, अशा ग्राहकांनी तसेच ज्यांना नव्याने क्रमांक नोंदवायचा अशा ग्राहकांनी 24 तास सुरू असणाऱ्या 1912 किंवा 1800-102-3435 व 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकांवर, https://pro.mahadiscom.in/ConsumerInfo/consumer.jsp या संकेतस्थळावर किंवा महावितरण अ‍ॅपवर नोंदणी करावी. परिमंडलातील 1 लाख 7 हजार 396 कृषिपंपधारक ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक नोंदवलेले नाहीत. वीजबिलाचा तपशील व इतर माहिती मिळवण्यासाठी या ग्राहकांनीही आपले क्रमांक वरील पद्धतीने नोंदवण्याचे आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.

Exit mobile version