Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोबाईलवर बोलणे , इंटरनेटही महागणार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशभरातील टेलीकॉम कंपन्यांनी येणाऱ्या महिन्यांमध्ये दरवाढ करण्याची तयारी सुरु केली आहे. या दरवाढीचा थेट फटका मोबाइल वापरणाऱ्यांना बसून फोन कॉल तसेच इंटरनेटचेही दर यामुळे वाढणार आहेत.

 

टेलीकॉम कंपन्या एक एप्रिल म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून दरवाढ करण्याच्या विचारात आहेत. इनव्हेस्टमेंट इनफॉर्मेशन अ‍ॅण्ड क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या अहवालानुसार एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये नफा वाढवण्याच्या दृष्टीने कंपन्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही दरवाढ नक्की किती असेल यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

 

दरवाढ केल्याने आणि ग्राहकांना टू जी वरुन फोर जी सेवेकडे जाण्यासाठी प्रवृत्त केल्याने दर वापरकर्त्यामागील सरासरी नफा वाढण्याची कंपन्यांना अपेक्षा आहे. अर्थ्या वर्षात हा नफा जवळजवळ २२० कोटींपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पुढील दोन वर्षांमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचा नफा ११ ते १३ टक्के आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ऑप्रेटिंग मार्जिनचा नफा ३८ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

 

लॉकडाउन आणि त्यामुळे आलेल्या आर्थिक मंदीच्या वातारवणामध्येही टेलिकॉम क्षेत्राला विशेष फटका बसला नाही. उलट लॉकडाउनच्या कालावधीमध्ये इंटरनेटचा वापर वाढल्याने कंपन्यांना त्याचा आर्थिक फायदा झाला. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शाळा, व्हिडीओ कॉल्स यामुळे इंटरनेटचा वापर वाढल्याने लॉकडाउनमध्येही कंपन्यांची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत झाली.

 

टेलिकॉम कंपन्या एकूण अ‍ॅडजेस्टेड ग्रास रेव्हेन्यू म्हणजेच एजीआर म्हणून १.६९ लाख कोटी देणं लागतात. आतापर्यंत यापैकी केवळ ३० हजार २५४ कोटी रुपये १५ टेलिकॉम कंपन्यांनी दिले आहेत. एअरटेल २५ हजार ९७६ कोटी, व्होडाफोन आयडीया ५० हजार ३९९ कोटी आणि टाटा टेलीसर्विसेज १६ हजार कोटी  ७९८ रुपये देणं लागतात. कंपन्यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा दरवाढ केली होती.

Exit mobile version