Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारविरोधात काँग्रेसची उद्या राज्यभर निदर्शने

 

मुंबई : वृत्तसंस्था । मोदींच्या सात वर्षातील कारभाराचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस उद्या राज्यभर आंदोलन करत सरकारच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली

 

अधिक माहिती देताना पटोले म्हणाले की, वर्षाला दोन कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, काळा पैसा भारतात आणणार, १०० दिवसात महागाई कमी करणार, ‘ना खाऊंगा ना खाणे दूँगा’ म्हणत देशाची ‘चौकीदारी’ करण्याची भलीमोठी आश्वासने देत नरेंद्र मोदी सत्तेवर आले पण सात वर्षानंतरही मोदींनी दिलेल्या आश्वासनातील एकही ते पूर्ण करु शकले नाहीत. सात वर्षात महागाई एवढी वाढली की लोकांचे जगणे मुश्कील झाले, नोटाबंदीने देशातील छोटे, मध्यम, लघु उद्योग बंद पडले, बेरोजगारी प्रचंड वाढली. काळे कायदे आणून शेतकरी व कामगार देशोधडीला लावले. बँका, रेल्वे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या उद्योगपती मित्रांना विकल्या, समाजा-समाजात भांडणे लावण्याचे उद्योग केले. मोदींच्या राज्यात समाजातील एकही घटक समाधानी नाही.

 

मोदींच्या या जुलमी, अहंकारी, हुकुमशाही कारभाराचा निषेध करण्यासाठी ३० मे रोजी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार असून जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी मोदी सरकार विरोधात काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. मोदी सरकारच्या सात वर्षाच्या कार्यकाळात देशात काळोखच पसरला आहे. काळे कायदे आणले गेले, याचे निदर्शक म्हणून काळे झेंडे दाखवले जातील. निदर्शनाच्या ठिकाणी प्रतिकात्मक सात पुतळे ठेवले जातील. राज्यातील प्रत्येक विभागात काँग्रेसचे वरिष्ठ नेते, मंत्री पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करतील.

 

मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नाशिकमध्ये विधिमंडळ पक्षनेते  बाळासाहेब थोरात, नागपूरमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत, अमरावती येथे मंत्री विजय वडेट्टीवार, लातूरमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कोल्हापूरमध्ये गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. खा. कुमार केतकर मोदी सरकारच्या सात वर्षाचे अपयश ऑनलाईन व्याख्यानातून उघड करतील. कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सुचना व नियमांचे पालून करून हे आंदोलन केले जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

 

Exit mobile version