Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन-थोरात

मुंबई प्रतिनिधी । चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्‍वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चिनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. याचा जाब विचारण्यासाठी आज काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. या अनुषंगाने आज २६ जून रोजी शहिदों को सलाम दिवस पाळला जाणार आहे.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्‍वभूमीवर सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळेत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम करताना फिजिकल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच करावेत याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करून केला जाणार असल्याची माहिती सुध्दा बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

Exit mobile version