Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदी जातीयवादीच — रामचंद्र गुहा

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  एकीकडे मागील वर्षी मोदी सरकारने तबलिगींना लक्ष्य केलं. मात्र दुसरीकडे त्यांनी लाखो हिंदू हरिद्वारमध्ये एकत्र येऊन स्नान करत असल्याची गोष्ट स्वीकारली यावरुनच ते जातीयवादी असल्याच दिसून येतं आहे,”  असा आक्षेप राजकारणाचे अभ्यासक रामचंद्र गुहा यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या भूमिकेवर घेतला आहे

 

“मोदी हे आजही मनापासून संघाशी जोडलेले आहेत,” असं त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दल बोलताना गुहा सांगतात. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान मोदी दोघेही पूर्णपणे जातीयवादी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार केला तसेच कोरोनाचा फैलाव होईल हे ठाऊक असतानाही मोदींनी कुंभमेळा आणि शाही स्नानाला परवानगी  दिली असेही ते म्हणाले .

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व चांगल्या गोष्टींचं श्रेय घेण्याची सवय असून वाईट गोष्टींसाठी मात्र ते राज्य सरकारं तसेच विरोधी पक्षांना जबाबदार ठरवतात, असं परखड मत इतिहासकार आणि राजकीय क्षेत्रातील जाणकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. पत्रकार करण थापा यांना  दिलेल्या मुलाखतीमध्ये गुहा यांनी मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी मोदी हे जातीयवादी असल्याची टीकाही केली असून कोरोना कालावधीमध्ये त्यांनी कुंभमेळ्याला दिलेल्या परवानगीवरुन हे दिसून येत असल्याचं म्हटलं आहे.

 

 

मोदींचे स्वभाव वैशिष्ट्य सांगताना गुहा यांनी ‘कल्ट पर्सनॅलिटी’ हा शब्द वापरला आहे. कल्ट पर्सनॅलिटी म्हणजे आपले व्यक्तीमत्व हे एखाद्या पंथाच्या प्रमुखाप्रमाणे असल्यासारखं वागणं. “सर्व गोष्टींचं श्रेय आपल्याला मिळावं अशी मोदींची इच्छा असते. आधीच्या सरकारांनी केलेलं चांगलं काम मोदी अनेकदा नाकारतात. मोदी सरकारच्या कारभाराबद्दल बोलायचं झाल्यास, सर्व वाईट गोष्टींसाठी राज्य सरकारं आणि विरोधी पक्ष जबाबदार असल्याचं दाखवलं जातं. काही चूक झाली तर मंत्रीमंडळातील नेत्यांना त्याबद्दलचं उत्तर जनतेसमोर येऊन द्यावं लागतं. केवळ चांगल्या गोष्टींचं श्रेय घेण्यासाठी मोदी पुढे येतात”, असं गुहा यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

 

“मोदींनी स्वत:ला त्यांच्या होकारात होकार मिळवणाऱ्या आणि समर्थकांच्या गराड्यामध्ये घेरुन ठेवलं आहे. अनेक आयएएस अधिकाऱ्यांची हुशारी आणि कामातील अचूकता ही पंतप्रधानांपेक्षा अधिक असल्याने त्यांना दूर लोटण्यात आलं आहे. मोदींना फुशारक्या मारणं आणि श्रेष्ठ असल्याची भ्रामक कल्पना डोक्यात ठेऊन वावरायला आवडतं,” असं गुहा म्हणाले आहेत.

Exit mobile version