Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींना भेटण्याआधी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा

 

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था ।  शरद पवार आज  मोदींची भेट घेण्यापूर्वी  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चां आहे.

 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत होते दिल्लीत त्यांनी नव्या केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. ही चर्चा किती तास चालली?, कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली याचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

 

फडणवीस आणि पवार दिल्लीत भेटल्याने या भेटीला अधिक महत्त्व आलं आहे. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत राजकीय चर्चाच झाल्याचं सांगण्यात येत आहे. या भेटीत सहकारावर चर्चा झाली असून साखर कारखान्यांवर होत असलेल्या कारवाईवरही चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवरही या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असंही बोललं जात आहे. मात्र, हे सर्व तर्क असून त्याला दोन्ही पक्षातील कोणत्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.

 

शरद पवार यांनी आज सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे मोदींसोबतच्या बैठकीत कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

 

शरद पवारांची मोदींसोबतची चर्चा केवळ प्रशासकीय आहे असं वाटत नाही. पियुष गोयल पवारांना भेटले होते. त्यानंतर राजनाथ सिंह भेटले. त्यानंतर आता मोदी-पवार भेट म्हणजे याला राजकीय अंग आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत समन्वयाचा सर्वात मोठा दुवा शरद पवार आहेत. महाराष्ट्रातील 48 जागा आहेत लोकसभेच्या. त्यामुळे पवारांना महत्त्व आहे. त्या अनुषंगाने आतापासून तयारी असू शकते. महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या जागी भाजप रिप्लेस झाली तर आश्चर्य वाटायला नको. २०२२ मध्ये पाच राज्यांच्या निकालाची वाट पाहण्याची गोष्ट करतात. महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. नाना पटोले सातत्याने पवारांना लक्ष करत आहेत. त्यामुळे काँग्रेसरहीत आघाडी महाराष्ट्रात होऊ शकते का, त्यादृष्टीनेही याकडे पाहायला हवं, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी सांगितलं.

 

Exit mobile version