Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींच्या माणसानेच लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला — माजी न्या . कोळसे पाटील

पुणे : वृत्तसंस्था । प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान, लाल किल्ल्यावर ज्यानं झेंडा फडकवला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस होता, असा थेट आरोप माजी न्यायमूर्ती बी . जी . कोळसे पाटील यांनी एल्गार परिषदेत केला आहे.

एल्गार परिषदेत कोळसे पाटील यांनी अनेक गोष्टींचा संदर्भ देत मोदी सरकारवर निशाणा साधला. “पंतप्रधान मोदींनी देशासाठी बरंच काही केलं आहे, असं सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात त्यांनी काहीही केलेलं नाही.” , असा आरोपही बी. जी. कोळसे पाटील यांनी मोदींवर केला आहे. पठाणकोटमध्ये मुंगीदेखील जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी दहशतवादी घुसले कसे? , असा प्रश्नदेखील कोळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुण्यात काल एल्लार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे एल्गार परिषद पार पडली. या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण जर परवानगी मिळाली नाही, तर रस्त्यावर या परिषदेचं आयोजन करण्यात येईल, असा इशारा निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली होती.

याआधी झालेली एल्गार परिषद वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे आजच्या होणाऱ्या या एल्गार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या आधी ३१ डिसेंबरला ही परिषद घेण्यास परवानगी नाकारणाऱ्या पोलिसांनी ३० जानेवारीला ही परिषद घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी या परिषदेचं आयोजन केलं. या परिषदेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिषदेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं. साध्या वेशातील पोलिसही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले होते.

Exit mobile version