मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींची टीका

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।  “कोरोनाशी लढण्यासाठी पाहिजे – योग्य हेतू, धोरण, निश्चय. महिन्यातून एकदा निरर्थक बोलणं नाही.” अशा शब्दांमध्ये ट्विट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. यानंतर आता, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

 

“पंतप्रधानांच्या खोट्या प्रतिमेसाठी कोणत्याही विभागाचा मंत्री कोणत्याही विषयावर काहीपण बोलण्यासाठी मजबूर आहे. देशाला सोबत घेऊन चला, विषाणूचा प्रादुर्भाव थांबवा, खोटं बोलणं बंद करा, लसीकरण मोठ्या प्रमाणात करा. केंद्र सरकारच्या प्राथमिकता – सोशल मीडिया, खोटी प्रतिमा, जनतेची प्राथमिकता – विक्रमी महागाई, कोरोना लस. हे कसले अच्छे दिन!” असं देखील या अगोदर राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करताना म्हटलेलं आहे.

 

लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं गेलं नाही तर कोरोना महामारीच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा देखील राहुल गांधींनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिला होता.

 

“अनेकदा सरकारला  सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं मोदींनी कोरोनाविरुद्ध विजय घोषित केला. त्यांनी कोरोनाला हरवलं असल्याचं जाहीर केलं. मात्र अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना कोरोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.” असं राहुल गांधी म्हणालेले आहेत.

 

Protected Content