Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहुणबारे येथे ५५ लाखांचा गुटखा पकडला; गुन्हा दाखल करण्यावरून आ.चव्हाण आक्रमक (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे ट्रकमध्ये अंदाजे ५५ लाख रूपयांचा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पकडला. हा ट्रक जळगावात आणत असतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी आज पहाटे चार वाजता शिरसोली येथे पाठलाग करून थांबविला. दरम्यान, मेहुणबारे येथे गुन्हा दाखल का केला नाही यावरून आमदार चव्हाण एलसीबीच्या पथकावर आक्रमक झाले होते. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार जिल्हा पेठ पोलीसात झिरो नंबरने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ०५५३) मध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिळाली. त्यानुसार रात्री ९ वाजेच्या सुमारास एलसीबीच्या पथकाने कारवाई करत ट्रक अडविला. या ट्रकची तपासणी केली असता त्यात अंदाजे ५५ ते ६० लाख रूपयांचा गुटखा असल्याचे समोर आले. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबीच्या पथक ट्रक घेवून जळगावला रवाना झाले. ही माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मिळाल्यानंतर त्यांनी ट्रकचा पाठलाग करून आज सकाळी ४ जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ ट्रक पकडला. दरम्यान, ज्या ठिकाणी हा ट्रक पकडला त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात गुटखा पकडल्याचा गुन्हा का दाखल केला नाही यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि आ. चव्हाण यांच्यात वाद झाला. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या सुचनेनुसार जळगाव जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून ट्रकमध्ये भरलेल्या सर्व गोण्यात उतरविण्यात आले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

तीन दिवसांपुर्वीच अमळनेर शहरात सुमारे पाच लाखांचा गुटखा पकडला होता. त्यासंदर्भातील गुन्हा अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मग मेहुणबारे येथे पकलेला ट्रक असल्याने मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली. वादाच्या ठिकाणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे अकबर पटेल यांची उपस्थिती होती.

ट्रकचालकासह एकाला पोलीसांनी अटक केली असून संपुर्ण माल जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात झिरो नंबरने गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

 

Exit mobile version