Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहुणबारे येथील माजी विद्यार्थी संघटनेतर्फे गिरणोत्सव उत्साहात

दिलीप घोरपडे यांच्या दुर्गसंवर्धन कार्याचा गौरव

चाळीसगाव प्रतिनिधी ।तालुक्यातील मेहुणबारे पंचक्रोशी माजी विद्यार्थी संघटनेमार्फत गिरणोत्सवाच्या अंतर्गत व्याखानासह विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

मेहुणबारे येथील भूमिपुत्र असलेले परंतु आपल्या उद्योग व्यवसाय आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी जाऊन राहणार्‍या लक्ष्मण वाघ, दिलीप बारावकर, अशोक कुमावत, देविदास खैरनार आदींच्या नेतृत्वाखाली माजी विद्यार्थी संघटना काम करत आहे. आपल्या परिसरातील विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच विद्यालय व महाविद्यालय विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य गाजविल्या बद्दल त्यांनाही सन्मानित करून प्रोत्साहन देण्याचे काम ही संघटना दरवर्षी करत असते.

या अनुषंगाने यंदा चाळीसगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील काम करणार्‍या व्यक्तींमध्ये दुर्ग-संवर्धन कार्य करणार्‍या सह्याद्री प्रतिष्ठानच्या दिलीप घोरपडे, चाळीसगावचे प्रसिद्ध चित्रकार धर्मराज खैरनार, उद्योजक मनोज चव्हाण, साहित्यिक अशोक वाबळे तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांसाठी काम करणारे महाजन आणि नवोदित चित्रकार कपिल गढरी यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी नांदेड येथील डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांचे दुरावा संवादातील या विषयावरील व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात डॉक्टर किनाळकर यांनी आजच्या धकाधकीच्या व मोबाईलच्या जगात परिवारातील संपत चाललेल्या संवादाविषयी प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगगंध कला न्यासचे डॉक्टर मुकुंद करंबळेकर हे होते. याप्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version