Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरूणमध्ये संगीतमय भागवत कथा, हरीनाम कीर्तन सप्ताह

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील मेहरूण भागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेमध्ये भाविकांना दररोज परमेश्वर अनुभूती येत आहे. भागवत कथेवेळी भगवान श्रीकृष्ण जन्म सोहळ्याच्या सजीव देखाव्याला भाविकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. मेहरूण परिसरात या कीर्तन सप्ताहामध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे.

बोदवड तालुक्यातील सुरवाडा येथील ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे दररोज दुपारी संगीतमय भागवत कथा सांगत आहे. यामध्ये शनिवारी भगवान श्रीकृष्णाचा जन्म सोहळा झाला. यात वासुदेवाच्या भूमिकेत संतोष चाटे यांनी टोपलीत श्रीकृष्णाला घेऊन जात असल्याचा सजीव देखावा सादर केला.

टाळ चिपळ्यांच्या गजरात आणि वाद्यांच्या उत्साहात वासुदेव श्रीकृष्ण बाळाला टोपलीत घेऊन मंडपात आला आणि पाळण्यात बाळाला ठेवले. यावेळी एकच जल्लोष झाला. त्यांनतर महिला भाविकांनी श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा केला. भगवान श्रीकृष्णाचा महिमा ज्ञानेश्वर महाराज यांनी कथेमध्ये सांगितला.

रविवारी दि. २० नोव्हेंबर रोजी भगवान श्रीकृष्ण यांचा विवाह सोहळ्याचा सजीव देखावा साकारण्यात येणार आहे.

प्रसंगी मेहरूणमधील नगरसेवक प्रशांत नाईक, श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी व मेहरूण भागातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Exit mobile version