Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, संगीतमय भागवत कथेला प्रारंभ

जळगाव, प्रतिनिधी | सर्वजन कल्याणार्थ तसेच जीवनात चैतन्य मिळावे, आध्यात्मिक विकास व्हावा, मानसिक दुर्बलता नष्ट होऊन जीवन सुकर करीत आत्मिक बळ मिळावे यासाठी मेहरुण प्रभागात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्या प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि.२५ नोव्हेंबर रोजी श्रीमद् भागवत कथा पूजनाने किर्तन सप्ताहाला भाविकांच्या उत्साहात प्रारंभ झाला.

येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे दि.२५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे २१ वे वर्षे आहे. हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ गुरुवारी २५ नोव्हेंबर रोजी झाला.

सकाळी ९ वाजता श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन माजी महापौर नितीन लढ्ढा आणि माजी नगरसेविका अलकाताई लढ्ढा यांच्या हस्ते झाले. प्रसंगी संतांच्या प्रतिमेसह प्रभागातील माजी नगरसेवक सुभद्राताई व सुरेश नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोदवड तालुक्यातील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांच्यासह श्रीमद् भागवत कथेतील सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रभागातील नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य व सप्ताह आयोजक प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी उपस्थित होते. प्रसंगी महाआरती करण्यात आली. मेहरूण प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुपारी १ ते ४ यावेळेत श्रवणीय संगीतमय भागवत कथेला ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर यांनी सुरुवात केली. कथा वाचक ज्ञानेश्वर महाराज यांनी पहिल्या दिवशी कथा महात्म्य वर्णन करीत श्रीमद् भागवत कथा ही जनकल्याणकारी व भाविकांना मन:शांतीच्या मार्गावर नेणारी असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर महाराज यांना विणेवर निवृत्ती महाराज माळी, भास्कर महाजन, पेटीवर टाकळीचे कृष्णा महाराज, मृदुंग व तबल्यावर राजूरचे ज्ञानेश्वर महाराज यांनी साथ दिली. गहूखेड्याचे लखन महाराज आणि कौली ता. सोयगाव येथील जीवन महाराज यांनी कथेतील प्रसंगांचे गायन करीत कथा सुश्राव्य केली. टाळकरी मेहरुणमधील श्रीराम भजनी मंडळ आणि श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ होते.

संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ घेण्यात आले. कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर चौक येथील कै. सुरेशमामा नाईक यांच्या घराजवळ मेहरुण भागामध्ये होत आहे.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version