Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे २५ नोव्हेंबरपासून आयोजन

जळगाव, प्रतिनिधी | येथील मेहरुण भागामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा (संगीत) चे दि.२५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे २१ वे वर्षे आहे. जळगाववासियांनी या किर्तन सप्ताह तथा भागवत कथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह सामाजिक संस्थांनी केले आहे.

 

जीवनात सर्वत्र चैतन्य यावे, दु:खीकष्टी वाटणार्‍या मनाचा कीर्तन व प्रवचन श्रवणाने अध्यात्मिक विकास होऊन मनातील दुर्बलता नष्ट व्हावी यासाठी हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य, प्रभागातील नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक यांनी दिली.

हरिनाम संकीर्तन सप्ताह उत्सवाचा प्रारंभ २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६ या वेळेत काकड आरती, दुपारी १ ते ४ संगीतमय भागवत कथेचे आयोजन, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्री ८ ते १० हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी श्रीमद् भागवत ग्रंथ पुजन माजी महापौर नितीन लढढा आणि माजी नगरसेविका अलका लढढा यांच्या हस्ते होईल.सर्व कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर चौक कै. सुरेशमामा नाईक यांच्या घराजवळ मेहरुण भागामध्ये होणार आहे.

श्रीमद् भागवत कथा सुरवाडा येथील तुकाराम महाराज देवस्थान येथील ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज शेलवडकर हे सांगणार आहेत. ते शेवटच्या दिवशी २ डिसेंबर रोजी रात्री काल्याचे किर्तनदेखील करणार आहे. दररोज आठ दिवस २५ रोजी जामनेर येथील मंगलाताई महाराज, २६ रोजी कैली येथील जीवन महाराज, २७ रोजी तळवेल येथील किशोर महाराज, २८ रोजी गोजेरा येथील शरद महाराज, २९ रोजी शेंदुर्णी येथील कन्हैया महाराज, ३० रोजी धामणगाव बढे येथील सदानंद महाराज, १ डिसेंबर रोजी बेटावद खुर्द येथील अमृत महाराज गाडे हे रात्री ८ ते १० वाजेदरम्यान हरी कीर्तन करणार आहे.

सप्ताहाची सांगता २ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रीमद् भागवत कथा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून केली जाणार आहे. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, उद्योजक अशोक जैन, शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे, महापौर जयश्री महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह आमदार, खासदार व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता श्रीमद् भागवत कथेची दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीनंतर भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सप्ताह यशस्वी होण्यासाठी श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, श्रीराम तरुण मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जय जवान मित्र मंडळ, जय दुर्गा ग्रुप, साई दत्त ग्रुप, वंजारी युवा संघटना, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे कर्मचारी तसेच मेहरुणचे ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version