Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील महिला अधिकाऱ्याची आत्महत्या ; उपवनसंरक्षकाला अटक

 

अमरावती  : वृत्तसंस्था । जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यान अंतर्गत  हरीसाल वन परीश्रेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी  शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली.

 

या २८ वर्षीय तरूण महिला अधिकाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं  म्हटलं आहे.

 

दीपाली  डॅशिंग अधिकारी होत्या. त्यांनी आत्महत्या केली हे अनेक अधिकारी अजूनही मानायला तयार नाहीत. त्यांची हत्या झाल्याचा सूर वनविभागात आहे. मूळच्या सातारच्या असणाऱ्या दिपाली चव्हाण यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र वन सेवा 2014 परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. जिथे माणसं कामं करायला घाबरतात तिथे ही तरूण अधिकारी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवत होती. त्यांच्या कामाची सर्वत्र चर्चा होती. रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडले होते. त्यातून त्यांची ओळख “लेडी सिंघम” अशी झाली होती.

 

 

कमालीचे डेअरिंग आणि स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाही, असा अंदाज परिचितांनी वर्तवला आहे. त्यांनी हरिसाल वन परिक्षेत्राची धुरा सांभाळली. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालूर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. माणसांना लाजवेल काहीशी त्यांची कामगिरी होती. पण त्यांच्या कर्तबगारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर लागल्याचे वनखात्यात बोलले जात आहे. त्यांची वेळोवेळी मुस्कटदाबी केली जात होती. गर्भवती असताना त्या मालूर येथे कच्च्या रस्त्यातून पायी फिरत होत्या. सुट्टी दिली जात नव्हती. पगार रोखून धरला जात होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात त्यांनी या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.

 

 

 

 

हरिसाल येथे रूजू झाल्यापासुन त्यांच्या मोबाइलचे सर्व रेकॉर्ड  तपासले गेले पाहिजे. तेव्हा कुठे दिपालीचा बळी घेणारे हाती लागतील, अशी मागणीदेखील होत आहे. दरम्यान पत्रात दीपालीने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला ते उपवनसंरक्षक शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावर आज अटक करण्यात आली. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी नॉट रीचेबल आहेत.

Exit mobile version