Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय चुकीचा ; देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, वृत्तसंस्था । भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा मुंबईतील आरेमधील मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं हलवण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा आरोप पुरावे देऊन केला आहे.

मेट्रो कारशेडच्या निर्णयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून खुलासा केला आहे. यात ‘मेट्रो ३ आणि मेट्रो ६ या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली होती असा खुलासा केला आहे.

मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय सुद्धा होता, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले. अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीने याबद्दल काही निरीक्षण नोंदवली आहे.

आरे कारशेडचे नियोजन करतांना पर्यावरण रक्षणावर सर्वाधिक भर देण्यात आला. कार्बन उत्सर्जन कमी करणे, सोलार पॅनल्स, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर, वीजवापर कमी करण्यासाठी एलईडी लाईट्स इत्यादींचे नियोजन असे ते निरीक्षण आहे. या प्रकल्पाला आणखी विलंब करण्यामुळे कार्बनचे उत्सर्जन आणखी वाढणार आहे, त्यामुळे वृक्षतोडीच्या परिणामांच्या तुलनेत आरेचीच जागा अधिक पर्यावरणपूरक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

Exit mobile version