मूल्यव्यवस्थेचे पुनर्जागरण साहित्यातून अपेक्षित- प्रा. डॉ. रवींद्र पाटील

चोपडा प्रतिनिधी । भांडवलशाहीमुळे सामान्य माणसाची झालेली कोंडी, महानगरीय तत्वज्ञान, समाजातील दाहक वास्तव याचे चित्रण या साहित्यातून प्रकर्षाने जाणवते. यासाठी साहित्यकारांनी कथा, कादंबरी, कविता, नाटक, प्रहसन, गाणी हे साहित्यप्रकार निवडले आहेत. कलावंताच्या अस्वस्थतेचे प्रकटीकरण साहित्यातून होत असते. मूल्यव्यवस्थेचे पुनर्जागरण साहित्यिकाला अपेक्षित असते, असे प्रतिपादन चोपडा येथील साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र पाटील (सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा) यांनी केले.

नाटक हे महाराष्ट्रीय संस्कृतीचे एक आगळेवेगळे महत्त्व विशद करते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी साहित्यात अनेक बहुमूल्य नाटके निर्माण झाली.  तर १९६० नंतरच्या साहित्यात सभोवतालच्या विस्कटलेल्या परिस्थितीचे वास्तव चित्रण साहित्यकारांनी केल्याचे आढळून येते. असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘मसाप गप्पा’ या ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांच्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या दोन अंकी नाटकाविषयी विवेचन केले. १९९० नंतरच्या उत्तर आधुनिक समाजाचे चित्रण असलेल्या या नाटकाचा नायक एका कीर्तनकाराचा मुलगा असलेला सत्यविजय दाभाडे हा सेवानिवृत्त पापभिरू नागरिक आहे. मुंबईत समुद्रकिनारी असलेल्या त्याच्या मालकीच्या फ्लॅटवर एका कावेबाज बिल्डरची नजर पडते.

राजकारणी, पोलीस, बिल्डर, सत्ताधारी यांची अभद्र युती होऊन दाभाडेच्या फ्लॅटमध्ये घुसखोरी केली जाऊन काही खोल्यांचा ताबा बेकायदेशीरपणे मिळवला जातो. अखेर सत्यविजय दाभाडे या अभद्र युती पुढे पराभूत होतो, अशी लोकशाहीची दुखरी बाजू असणारी दंडेलशाही या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आली आहे, असे या या नाट्यकृती चा परिचय करून देताना डॉ. रविंद्र पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कविवर्य अशोक नीलकंठ सोनवणे यांनी शाखेच्यावतीने त्यांचे स्वागत केले तसेच मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष विलास पाटील खेडीभोकरीकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रमुख कार्यवाह संजय बारी यांनी सूत्रसंचालन तर कोषाध्यक्ष योगेश चौधरी यांनी आभार मानले. यावेळी श्रोत्यांनी नाटकासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डॉ. पाटील यांनी दिली. या ऑनलाइन गप्पांना मसाप शाखेचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Protected Content