Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुस्लीम युवकांचा कोरोना मृत रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार : घडविले माणुसकीचे दर्शन

 

फैजपूर, प्रतिनिधी । मयत झालेल्या हिंदू कोरोना रुग्णाचे  लांबवर असलेले नातेवाईक वेळेवर पोहचू शकत नसल्याने फैजपूर शहरातील मुस्लिम तरुणांनी मयत व्यक्तीचे पार्थिव न्हावी ग्रामीण रुग्णालयातुन हलविण्यापासून तर स्मशानभूमीत पोहचवत अंत्यविधीसाठी सहकार्य करून माणुसकीचे एक अनोखे  दर्शन घडविले.  यावेळी रुग्णालयात केवळ मयताची पत्नी,शालक उपस्थित होता. 

शालकाने दिला अग्निडाग 

भालोद ता. यावल येथील एक ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती.  त्याला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास न्हावी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांची डॉ. अभिजित सरोदे यांनी तपासणी करून त्यांना  मृत घोषित केले.  दरम्यान मृत व्यक्ती सोबत यावेळी केवळ त्याची पत्नी उपस्थित होती तर अन्य नातेवाईक हे दूरवर राहत असल्याने ते अंत्यसंस्कारसाठी पोहचू शकत नव्हते.  त्यामुळे अंत्यविधीचे सोपस्कार रूग्णालय मार्फत करावे अथवा अन्य पद्धतीने करावे असा पेच निर्माण झाला होता.  फैजपूरचे नगरसेवक शेख कुर्बान शेख करीम यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्यासोबत चार मुस्लिम तरुण व पालिकेचे सफाई कामगार अशा सर्वाना सोबत घेऊन न्हावी ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. यात मुस्लिम तरुण अशपाक कुरेशी, जुबेर बेग, शरीफ खान, उमर खान, पालिका कर्मचारी मयूर चिरावंडे, अनिल अटवाल सर्वांनी पीपीइ किट परिधान करीत मयत व्यक्तीला न्हावी ग्रामीण रुग्णालयातुन स्मशान भूमी न्हावीपर्यंत नेण्यासाठी सहकार्य केले.  त्यानंतर अंत्यविधीसाठी हातभार लावला. यावेळी मयताचे शालक यांनी अग्निडाग दिला. यावेळी फैजपूरचे नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, नगरसेवक केतन किरंगे, न्हावीचे पोलीस पाटील संजय चौधरी, संजय वाघूळदे यांचीही उपस्थित होती. यावेळी हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला मुस्लिम तरुणांनी केलेले सहकार्य माणुसकीचे दर्शन घडविले.

 

Exit mobile version