Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुस्लिमांचं नागरिकत्व कायद्यामुळे नुकसान नाही — सरसंघचालक

 

गुवाहाटी ( आसाम ) : वृत्तसंस्था ।  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत  देशातील मुस्लिमांचं सीएए अर्थात नागरिकत्व कायद्यामुळे कोणतंही नुकसान होणार नसल्याचं म्हणाले आहेत.

 

याच विषयावरील एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी गुवाहाटीमध्ये मोहन भागवत बोलत होते.

 

देशात कोरोनाची लाट येण्यापूर्वी दिल्लीच्या शाहीन बागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात मोठं आंदोलन सुरू होतं. कोरोनाची लाट सुरू झाली आणि हे आंदोलन आणि त्यापाठोपाठ सीएए-एनआरसीचा मुद्दा देखील मागे पडला. मात्र, आता पुन्हा एकदा त्या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात सुरू असलेला वाद राजकीय फायद्यापोटी घातला जात असल्याचं यावेळी म्हटलं आहे. “सीएए आणि एनआरसी दोन्ही कायद्यांचा हिंदू-मुस्लीम मतभेगांशी काहीही संबंध नाही. त्याभोवती अशा गोष्टींची होणारी चर्चा ही जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी केली जात आहे”, असं ते म्हणाले. “सीएएमुळे मुस्लिमांचं कोणतंही नुकसान होणार नाही”, असं देखील त्यांनी नमूद केलं.

 

यावेळी मोहन भागवत यांनी सीएएमुळे देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण मिळेल, असं देखील नमूद केलं आहे. “स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की देशातील अल्पसंख्याकांची काळजी घेतली जईल. ते अजूनही केलं जात आहे. आपण यापुढेही ते करतच राहू. यासंदर्भात आपण इतर देशांमध्ये असलेल्या बहुसंख्यकांशी देखील चर्चा केली. यापैकी कुणाला जर धोका किंवा भितीमुळे भारतात यायची इच्छा असेल, तर आपण नक्कीच त्यांना मदत करायला हवी”, असं देखील भागवत म्हणाले आहेत.

 

एनआरसीविषयी बोलताना मोहन भागवत यांनी त्याचं समर्थन केलं आहे. “सर्वच देशांना आपले नागरीक कोण आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. यामध्ये सरकार सहभागी असल्यामुळे हे प्रकरण राजकीय व्यासपीठावर गेलं आहे. सीएए आणि एनआरसी या दोन्ही मुद्द्यांभोवती सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या गोष्टी पसरवून त्यातून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत”, असं मोहन भागवत म्हणाले आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावरून नवी चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version