Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्री ठाकरे आज चिपळूणमध्ये

 

मुंबई : वृत्तसंस्था । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही तळीयेनंतर आज चिपळूणकडे रवाना झाले चिपळूणमधील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत.

 

 

राज्यातील काही भागांत पावसाचं रौद्र रुप बघायला मिळालं. विशेषतः कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. प्रचंड पाऊस झाल्यानं अनेक शहरं आणि गावं पाण्याखाली गेली. तर रायगड, सातारा जिल्ह्यासह काही ठिकाणी दरडी कोसळून मोठी जीवित हानी झाली. दरम्यान, पावसाने उसंत घेतल्यानं पाणी ओसरू लागलं असून, मदत व बचाव कार्यालाही वेग आला आहे.

 

सलग तीन दिवस थैमान घातलेल्या पावसानं राज्यात आता उसंत घेतल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस थांबला असला, तरी कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत.  चिपळूण, महाडमध्ये पूराचं पाणी ओसरलं असलं, तरी आता सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे. रायगडमध्येही भूस्खलन झालेल्या ठिकाणी पाऊसाने विश्रांती घेतल्यानं मदतकार्याला वेग आला आहे. पुरग्रस्त भागातील परिस्थिती संथगतीने पूर्वपदावर येताना दिसत असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज कोकणातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

 

तिन्ही नेते पुरग्रस्त भागांना भेटी देणार आहेत. नारायण राणे यांनी ट्वीट करून याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत”, असं राणे यांनी म्हटलं आहे.

 

 

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पुराचा फटका बसलेल्या चिपळूणला भेट देणार आहेत. सकाळी सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणकडे रवाना झाले.  उद्धव ठाकरे चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. चिपळूणची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील नुकसानाचा आढावा घेण्यासाठी जाणार आहेत

 

Exit mobile version