Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुख्यमंत्री अजूनही गप्प का ? – देवेंद्र फडणवीस

मुंबई :  वृत्तसंस्था ।  गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मुद्द्यावर काहीच का बोलत नाहीत , असा प्रश्न आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे . 

 

अनिल देशमुख  नागपूरच्या निवासस्थानी रवाना होण्याची शक्यता आहे.   माध्यमांशी देखील न बोलता देशमुख रवाना झाले.

 

 

अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  पत्रकार परिषद घेतली . या सरकारकडे नैतिकता शिल्लक आहे का हे विचारावं लागेल, असे ते म्हणाले. हा राजीनामा झाला असला तरी आजूनही एका गोष्टीचं कोडं मला पडलं आहे. इतक्या भयावह घटना राज्यात झाले. कधी नव्हे तेवढे आरोप मंत्र्यांवर लागले. मात्र, अजूनही मुख्यमंत्री अजूनही बोलत नाहीतेय. अजूनही मुख्यमंत्री शांत आहेत. हे अस्वस्थ करणारं आहे. त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. त्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवतेय. ते म्हणाले होते, की वाझे काय लादेन आहे का?, त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर अजूनही मुख्यमंंत्री का बोलत नाहीत, हा माझा सवाल आहे. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं. त्यांनी चूक सुधारु असं सांगणं अपेक्षित आहे, असे फडणवीस म्हणाले.

 

नैतिकता आधीच आठवायला हवी होती. मात्र, नैतिकता कधीजरी आठवली तरी त्यांच स्वागतच केलं पाहीजे, असंही फडणवीस म्हणाले. जेव्हा एखाद्या सिटींग गृहमंत्र्यावर चौकशी होत असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहता येत नाही. देशमुख यांच्याकडे राजीमाना देण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का हा प्रश्न विचारावा लागेल. याचं कारण म्हणजे, ज्या प्रकारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर तसेच आधी पोलिसांचा जो व्यवहार दिसतोय, त्याकडे पाहूनच  देशमुखांचे प्रकरण हे सीबीआयकडे दिले आहे.

 

 

देशमुखांची विनाकारण पाठराखण करण्यात आली. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर ते खातं आता मुख्यमंत्र्याकडे जाणार. त्यानंतर आता सरकारमधील तीन पक्ष गृहमंत्रिपद कोणाकडे द्यायचं ते ठऱवतील. जर गृहमंत्रिपदाचा भार सोपण्यात उशीर केला गेला तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अडचणीची ठरु शकते.

 

मी आधीच म्हणालो होतो की, हे जनतेच्या मनातील सरकार नाहीये. हे बेईमानीने आलेले तीन पायाचे सरकार आहे. दीड वर्षानंतर त्याचा अनुभव आता जनता घेत आहे. या राज्यामध्ये एका मुख्यमंत्र्याऐवजी सगळेच स्वत:ला मुख्यमंत्री समजतात.  हे सरकार तीन पायाचं असून ते तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने जात आहेत, त्याचा त्रास येथील जनता भोगत आहे.

 

अनिल देशमुख वसुलीचे टार्गेट प्रकरणात अनेक नावं समोर येतील. आगामी काळात पुराव्यासहित अनेक गोष्टी बाहेर येतील. त्यामध्ये सर्व काही स्पष्ट होईल, असेही फडणवीस म्हणाले

 

संजय राऊतांची परिस्थिती सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. त्यामुळे ते मला काही माहिती नाही, मला काही सांगता येणार नाही, अशा प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.

Exit mobile version