Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुकेश अंबानी यांची श्रीमंती वर्षभरात ७३ टक्के वाढली

मुंबई वृत्तसंस्था । सर्वाधिक श्रीमंत भारतीय होण्याचा मान रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी सलग नवव्या वर्षी पटकावला आहे. हुरुन रिपोर्ट या रुपर्ट हुगेवर्फ यांच्या संस्थेने आयआयएफएल वेल्थ संस्थेबरोबर केलेल्या एका सर्वेक्षणात ही बाब उघड झाली आहे. यावर्षी मुकेश अंबानी यांची श्रीमंती ७३ टक्के वाढत ६.५८ लाख कोटी रुपये झाली आहे. देशात कठोर टाळेबंदी होती तेव्हा अंबानी यांनी रिलायन्स जिओमधील हिस्सा विक्री करुन कोट्यवधा रुपयांची कमाई केली.

मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांपासून टेलिकॉम व रिटेल व्यवसायांतील हिस्साविक्रीचा धडाका लावला आहे. तरीही आघाडीच्या जागतिक उद्योगसमूहांमध्ये रिलायन्स उद्योगसमूह पहिल्या पाचांत स्थान टिकवून आहे. कोरोनामुळे देशाच्या आर्थिक, औद्योगिक तसेच सामाजिक वातावरण विपरित परिणाम झालेला असताना हा अहवाल आला असल्यामुळे एकूणच औद्योगिक क्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

अंबानी यांनी लाॅकडाउनमध्येही कमाईचा धडाका चालूच ठेवला. या रिपोर्टनुसार मुकेश अंबानी यांनी प्रत्येक तासाला ९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. जो एक प्रकारचा विक्रमच आहे. हुरुन रिपोर्ट या अहवालात ३१ ऑगस्टपर्यंत एक हजार कोटी रुपयांहून अधिक संपत्ती असलेल्या ८२८ भारतीयांची नावे देण्यात आली आहेत.

शापूरजी पालनजी समूहाच्या सायरस मिस्त्री आणि शापूर मिस्त्री यांची संपत्ती १ टक्का घसरत प्रत्येकी ७६ हजार कोटी रुपये झाली आहे. गौतम अदानी यांच्या श्रीमंतीत ४८ टक्के वाढ झाली असून ती १.४० लाख कोटी रुपये झाली आहे. यामुळे सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत गौतम अदानी यांचे नाव दोन क्रमांक वर चढले असून ते आता देशातील चौथे सर्वात श्रीमंत ठरले आहेत. हिंदुजा बंधूमध्ये सध्या कौटुंबिक वाद सुरू आहेत. त्यांच्या श्रीमंतीत २३ टक्के घसरण झाली आहे. तरीही १.४३ लाख कोटी रुपये संपत्तीसह त्यांना आपला सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतील दुसरा क्रमांक राखण्यात यश आले आहे. एचसीएलच्या शिव नाडार आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ३४ टक्क्यांनी वाढली असून ती १.४१ लाख कोटी रुपये जाली आहे. त्यामुळे शिव नाडार तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत भारतीय ठरले आहेत.

Exit mobile version