Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई मोनोरेल प्रकल्प प्रमुखांविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा

 

मुंबई : वृत्तसंस्था । एका कंपनीने पुरवलेल्या सेवांचे बिल मिटवण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मुंबई मोनोरेलच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात  कारवाई केली आहे.

 

लाच मिळावी यासाठी संबंधित कंपनीची फाईल मुद्दाम अडकवून ठेवल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता. तक्रारदाराची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी आहे.

 

एसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मते, तक्रारदाराची कंपनी स्वच्छता कर्मचारी, देखभाल आणि इतर सेवा पुरवते. त्यांनी जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत केलेल्या एका करारासाठी मुंबई मोनोरेलकडून २.५ कोटी रुपये घेण्यात आले होते. करारानुसार, तक्रारदाराने मुंबई मोनोरेलला बँक गॅरंटी म्हणून ३२ लाख रुपये दिले होते. त्यामुळे मुंबई मोनोरेलने तक्रारदाराला एकूण २.८२ कोटी रुपये देणं होतं.

 

मुंबई मोनोरेलच्या अधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केल्यानंतर, तक्रारदाला जानेवारी २०२१ मध्ये २.१ कोटी रुपये आणि त्यानंतर जूनमध्ये २२ लाख रुपये मिळाले. उर्वरित ५० लाख रुपयांची रक्कमेसाठी डॉ.डी.एल.एन मूर्ती यांनी तक्रारदार यांची फाईल स्वतःकडे अडकवून २० लाख रूपयांची मागणी केली, असे एसीबीने जारी केलेले निवेदनात म्हटले आहे.

 

“तक्रारदाराने २ जुलै रोजी वरळी येथील ACB मुख्यालयाशी संपर्क साधला. आम्ही चौकशी सुरू केली. सापळा रचण्याचा प्रयत्नही केला, परंतु काही झाले नाही म्हणून तक्रारदाराने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आम्ही लाच मागीतल्या प्रकरणी तक्रार दाखल केली,” असे एसीबीने सांगितले. मूर्तीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version