Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई महापालिकेत १०० कोटींचा घोटाळा : भाजप आमदाराचा आरोप

मुंबई प्रतिनिधी | मुंबई महापालिकेत सत्ताधार्‍यांनी  पालिका प्रशासनाला हाताशी धरून १०० कोटी रुपयांचा  घोटाळा केला असून ही निविदा तातडीने रद्द करून त्याची चौकशी करावी अशी मागणी भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी केली आहे.

 

भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेनेवर १०० कोटींच्या निविदा घोटाळ्याचा आरोप केला.   महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांना २८ ऑक्टोबर रोजी पत्र पाठवून ट्रेंचिंग निविदेत सत्ताधारी शिवसेनेच्या मदतीने काही कंत्राटदार संगनमताने घोटाळे करतील तसेच या निविदांच्या अटी व शर्ती बदलल्या जातील असे कळविले होते. १७ नोव्हेंबर रोजीही मिश्रा यांनी आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून निविदा प्रक्रियेतील संभाव्य घोटाळ्यांची पूर्वसूचना दिली होती. कंत्राटदारांकडून आपसात संगनमत करून कोणत्या दरांमध्ये निविदा भरली जाईल याचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला होता. १८ नोव्हेंबर रोजी निविदा सूचना प्रसिद्ध झाल्यानंतर मिश्रा यांनी आयुक्तांना दिलेली माहिती खरी होती हेच सिद्ध झाले आहे, असं कोटेचा यांनी सांगितलं.
तीन महिन्यातच रक्कम वाढली

मिश्रा यांनी आयुक्तांना पत्र पाठवूनही महापालिका प्रशासनाने निविदेत घोटाळे होऊ नयेत यासाठीची प्रतिबंधात्मक दक्षता घेतली नाही. २६ ऑगस्ट रोजी ट्रेंचिंगच्या याच कामाची निविदा प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पाच कंत्राटदारांनी या निविदेत ३८० कोटींची बोली सादर केली होती. मात्र १८ नोव्हेंबर रोजी ५६९ कोटींची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अवघ्या ३ महिन्यात निविदा रकमेत एवढी मोठी वाढ झाली आहे. या घोटाळ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल घेऊन तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पालिकेतील भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, प्रदेश प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट, महापालिकेतील पक्ष नेते विनोद मिश्रा, प्रविण छेडा आदी उपस्थित होते.

Exit mobile version