Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई पोलीस दलाची हायकोर्टाकडून प्रशंसा

मुंबई : वृत्तसंस्था । काही दिवसांत मुंबई पोलीस दल टीका-टिपण्णीद्वारे चर्चेत राहिलं आहे. मात्र, मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलीस दल जगातील एक चागंल पोलीस दल असल्याचं मत नोंदवलं आहे. कोविडच्या प्रचंड तणावाच्या काळातील मुंबई पोलीसांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुकही केलं आहे.

न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने म्हटलं की, “मुंबई पोलिसांची गणना जगातील सर्वाधिक उत्तम पोलिसांमध्ये केली जाते. नागरिकांनी त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. न्या. शिंदे म्हणाले, “आधीच मोठ्या तणावाखाली असताना मुंबई पोलिसांचं काम हे महामारीच्या काळातील कठीण समयी खूपच अवघड बनलं होतं. पोलीस अधिकारी सातत्याने काम करीत होते. १२ तासांहून अधिक काळ ते काम करीत होते. त्यानंतर सुरु झालेले मोर्चे आणि सणवार यांच्यासाठी बंदोबस्तालाही ते तैनात होते.”

सुनैना होले यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान खंडपीठानं मुंबई पोलिसांबाबत हे मत व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात होले यांनी आक्षेपार्ह मजूकर सोशल मीडियातून पोस्ट केला होता. यासाठी त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची सुनावणी हायकोर्टात सुरु असताना खंडपीठानं मुंबई पोलिसांबाबत निरिक्षण नोंदवलं.

गुरुवारी ही केस सुनावणीसाठी आल्यानंतर वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, होले या बीकेसी पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिलेल्या नाहीत त्या पोलिसांना सहकार्य करीत नाहीत. यावर न्या. शिंदे म्हणाले, तुम्हाला हे कळायला हवं की शहर पोलीस हे जगातील उत्तम पोलिसांपैकी एका आहेत. मुंबई पोलिसांची तुलना थेट स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. त्यामुळे जनतेकडूनही त्यांना थोडसं सहकार्य होणं गरजेचं आहे.

त्याचबरोबर खंडपीठाने होले यांना २ नोव्हेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी निश्चित केली.

Exit mobile version