Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवलीचा उड्डाणपूल कोसळला

कणकवली वृत्तसंस्था । मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली येथे नव्यानं बांधण्यात आलेला उड्डाणपूण कोसळला आहे. गणपतीसाठी चाकरमानी गावाकडे निघाले असतानाच ही घटना घडल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

अपघातात कुणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुंबई-गोवा हायवेच्या कणकवली शहरांतून जाणाऱ्या भागात ४५ खांबी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. या पुलाला जोडणारा एक भाग मागच्याच महिन्यात कोसळला होता. त्यावरून बांधकामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील सुरू होत्या.

हा वाद अजूनही सुरू असतानाच आज पुलाचा अर्धा भाग कोसळला आहे. पाऊस नसताना ही घटना घडलीय. बांधकाम कंत्राटदारांकडून केली जाणारी फसवाफसवी व सरकारी यंत्रणांचे होणारे दुर्लक्ष यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि नितीन गडकरी यांच्याकडं केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालय आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे. पुढची १०० वर्षे टिकेल असा काँक्रीटचा महामार्ग तयार करू, अशी घोषणा उद्घाटनाच्या वेळी गडकरी यांनी केली होती. त्यामुळं कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, महामार्गाच्या बांधकामात अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

Exit mobile version