Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबईसह राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा

 

 

मुंबई :  वृत्तसंस्था । मुंबईसह राज्यात पुढील ६ दिवस पुरेल एवढाचा रक्ताचा साठा असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली   नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसारख्या शहरांत रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. अशावेळी राज्यासमोर अजून हे  एक आव्हान उभं राहिलंय. .

 

कोरोना काळात राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे.  त्यामुळे महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावं. रुग्णालये आणि विविध सामाजिक संघटनांनीही पुढाकार घेत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे. यावेळी कोरोना नियमांचं पालन करण्यात यावं, असंही शिंगणे यांनी म्हटलंय.

 

राज्यात तुर्तास लॉकडाऊन करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, आपली सर्व चर्चा त्याच दिशेने सुरु आहे. पण याचा अर्थ राज्यात लॉकडाऊन लागेलच, असा नाही. पण सरकारला तशी तयारी करुन ठेवणे हे गरजेचे असते, असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. राज्यात 2 एप्रिलपासून लॉकडाऊन होणार की नाही, या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी ही माहिती दिली .  नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याच्या नियमांचे तंतोतंत पालन केले तर त्यांना कोरोना विषाणूची लागण होणारच नाही. तशा परिस्थितीत लॉकडाऊनचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

 

राज्यात काल दिवसभरात राज्यात तब्बल ३९५४४  नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर मृतांचा आकडासुद्धा लक्षणीयरीत्या वाढला असून दिवसभरात राज्यात तब्बल २२७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८५ . ३४ टक्के असून मृत्यूदर  १ . ९४ टक्क्यांवर पोहोचलाय.

Exit mobile version